अर्धविराम, हे एक असं चिन्ह आहे जे एका वाक्यातील दोन महत्त्वाच्या भागांना जोडून ठेवतं. एखादं वाक्य वाचताना समजा अर्धविराम आलाच; तर समजायचं वाक्य अजून संपलेलं नाही. पण, अर्धविराम केवळ एक व्याकरणातील चिन्ह म्हणून मर्यादित राहिलेलं नाही. या चिन्हाच्या व्याकरणातील अर्थाने त्याला वास्तविक जीवनात एक रूपकात्म अर्थ दिला आहे. एक असा अर्थ, जो अनेक नैराश्यग्रसितांचं प्रतिनिधित्व करतो; जो सांगतो की, ‘मी’ अजून संपलेलो/ली नाही.
व्याकरणातील अर्धविरामाच्या महत्त्वापासून ते वास्तविक मनोविश्लेषणात्मक अर्थापर्यंत जाणून घेऊयात अर्धविरामाची व्याप्ती; १६ एप्रिलला साजर्या झालेल्या अर्धविराम दिवसाच्या पार्श्वभूमीवर.
व्याकरणातील ‘अर्धविरामा’चे संदर्भ
‘शुद्धलेखन प्रदीप’ या मो. रा. वाळंबे आणि अरुण फडके यांच्या पुस्तकात अर्धविरामाची व्याख्या, “स्वल्पविराम आणि पूर्णविराम यांच्या दरम्यानचा विराम दाखवण्यासाठी वापरले जाणारे विरामचिन्ह” अशी केली आहे. “संयुक्त वाक्यात स्वल्पविरामयुक्त प्रधान वाक्ये असतील तर ती वेगळी दाखवण्यासाठी….;”
किंवा
“एकमेकांशी अप्रत्यक्ष संबंधित असे वाक्यांश किंवा उपवाक्ये वेगळी करण्यासाठी…” अशाही इतर व्याख्या पाहायला मिळतात. मराठीला विरामचिन्हांची बैठक देणारे मेजर थाॅमस कँडी, त्यांच्या ‘विरामचिन्हांची परिभाषा’ या पुस्तकात लिहितात, “ज्यांचा परस्पर जवळ संबंध नाही अशी जी निरनिराळी वाक्ये, किंवा वाक्यांगे, एका लांब वाक्यात येतात, त्या निरनिराळ्या वाक्यांच्या किंवा वाक्यांगांच्या मध्ये अर्धविरामचिन्ह पाहिजे.”
थोडक्यात काय वाक्य सांधणारे, वाक्य जोडणारे चिन्ह म्हणजेच ‘अर्धविराम’ किंवा ‘सेमी-कोलन.’ या विरामचिन्हाला जन्माला घातलं ते ऑल्डस मॅन्युशियस या इटालियन मुद्रक-प्रकाशकाने. १४९४ मध्ये ‘दी एटना’ या कार्डिनल पेट्रो बेम्बो यांच्या पुस्तकात पहिला अर्धविराम आढळतो.
का साजरा होतो जागतिक अर्धविराम दिन?
अर्धविराम ही जरी व्याकरणातील संज्ञा असली, तरी जागतिक अर्धविराम दिन साजरा करण्यामागे त्याचा तसा व्याकरणाशी संबंध नाही. जागतिक अर्धविराम दिन हा त्या नैराश्यग्रसितांसाठी साजरा केला जातो, जे नैराश्यात असूनही आत्महत्येचा पर्याय न निवडता, जगण्याच्या इच्छेने प्रेरित आहेत. नैराश्यातील व्यक्तींना नवी ऊर्मी, नवं जीवन मिळावे; त्यांच्यातील जगण्याची उमेद कायम राहावी या दृष्टीने जागतिक अर्धविराम दिन साजरा केला जातो. ‘प्रोजेक्ट सेमीकोलन’ या अमेरिकी सेवाभावी संस्थेच्या ॲमी ब्ल्युएलने २०१३ पासून या दिनाची सुरुवात केली.
कोण आहे ॲमी ब्ल्युएल?
प्रोजेक्ट सेमीकोलोन या संस्थेची संस्थापक, ॲमी ब्ल्युएल ही एक अमेरिकन तरुणी होती. ॲमी १० वर्षांची असताना तिचे लैंगिक शोषण झाले होते. त्यावेळी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पुन्हा १३ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कारदेखील करण्यात आला. तिच्या वडिलांनी ती १८ वर्षांची असताना नैराश्यामुळे आत्महत्या केली. ॲमी हे सहन करू शकली नव्हती. ती खोल नैराश्यात गेली होती. वडिलांच्या मृत्यूने प्रेरित होऊन, तिने नैराश्यातून मुक्ती मिळवू इच्छिणार्यांची संस्था काढायचं ठरवलं. जे आपल्या वडिलांचं झालं ते इतरांचं होऊ नये, नैराश्यामुळे आत्महत्या करणार्यांचं प्रमाण तेव्हाही भरपूर होतं व आजही आहे. हे रोखण्यासाठी समाजात, लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करणारी संस्था हवी म्हणून ॲमीने २०१३ साली ‘प्रोजेक्ट सेमिकोलन’ ही संस्था सुरू केली. ॲमी स्वतः बराच काळ नैराश्याशी झुंजत होती, पण हा संघर्ष जास्त काळ चालू शकला नाही. २३ मार्च २०१७ ला तिने आत्महत्या केली, जेव्हा तिचं वय अवघ्या ३१ वर्षांचं होतं. ‘प्रोजेक्ट सेमीकोलन’साठी ती एक प्रेरणा आहे.
पण सेमीकोलन-अर्धविरामच का?
अर्धविरामाचं व्याकरणिक महत्त्व आपण पाहिलं. दोन वाक्यांना जोडायचं काम करणारं हे चिन्ह, हे खुणावतं की वाक्य संपलेलं नाहीये. या इथे नैराश्यातून जीवनाकडे वळण्यासाठीचा, अर्धविराम हा एक साकव आहे. आपण आपल्या जीवनाची नव्याने सुरुवात करूयात. ‘नैराश्य’ हा केवळ एक अर्धविराम आहे, अजून भरपूर जीवन जगायचं आहे असा याचा अर्थ होतो. अनेक नैराश्यग्रसित किंवा नैराश्यातून बाहेर पडलेली माणसं (;) अर्धविराम स्वतःच्या शरीरावर गोंदवून घेतात. नैराश्याशी झुंजत असतानाही त्यांनी नव्याने जगण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे, याचीच अर्धविराम ही खूण आहे.
ॲमीने लिहिलेलं ‘प्रोजेक्ट सेमीकोलन – युअर स्टोरी इज नाॅट ओव्हर’ हे पुस्तक तिच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं. या पुस्तकात ॲमीची स्वतःची, अनेक नैराश्यापासून, PTSD (पोस्ट ट्राॅमॅटिक स्ट्रेस डिसाॅर्डर) पासून ग्रस्त असलेल्यांच्या संघर्षकथा आहेत.
अर्धविराम एका गुरूच्या भूमिकेत.
अर्धविराम ही खूण आता मानसिक ताकदीची खूण बनू लागलीये. ती आता माणसांना सांधतेय. नैराश्याकडून जीवनाकडच्या प्रवासात लोकांची सोबती बनत असताना अर्धविरामाने मूक ब्रीदाचं काम केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच अर्धविरामावर मराठी भाषा-साहित्याच्या प्राध्यापिका डाॅ. अनघा मांडवकर यांची कविता प्रेरक ठरू शकेल.
‘काय करावं बाबा तुझं ?!’
हा अनेकांना प्रश्न पडतो.
ना धड तू पूर्ण, ना धड तू स्वल्प,
दोघांची संपूर्ण रूपं वर-खाली चिकटवून
तुला ठसठशीत साकार केलं;
तरी
तुझ्या नावापासून
तुझ्या अस्तित्वापर्यंतचं
अर्धमूर्ध अधांतरपण
तुला अमूर्त, धूसर नि शंकास्पदच ठेवत आलंय…
तुझं अधूरंपण इतकं संसर्गकारी
की दोन पूर्ण, स्वतंत्र वाक्यंही
तुझ्या संगतीने साखळीत अडकतात !…
…तू येतोस त्यामुळे
सगळं संपलेलं नसतं;
आस, आशा, आकांक्षा प्रवाही राहते,
की अजूनही रचना होऊ शकते,
अजूनही अर्थ बदलू शकतो,
अजूनही …
…हे सत्य आहे की तू अर्धा आहेस;
पण म्हणूनच पूर्णत्वाचं स्वप्न आहे !
काय करायचं बापा तुझं ?!
राहा असाच धूसर, अधुरा,
हरळीच्या मुळांसारखा
चिवट नि जिवट…
शिकवत राहा
स्वल्प, अपूर्ण, पूर्ण ह्यांच्या अल्याडपल्याड वाहत राहणं,
अर्धूकलं पण सार्थसं जगतबिगत राहणं …
या कवितेतला अर्धविराम, हा अर्धामूर्धा असूनही आधारवडाप्रमाणेच आहे. तो संपलेला नाही, जगण्याची आणि इतरांना जिवंत ठेवण्याची उमेद त्यात आहे. नैराश्यातून बाहेर पडणार्या सर्वांना आणि त्यांना बाहेर काढणार्या प्रत्येकाला ‘जागतिक अर्धविराम दिनाच्या शुभेच्छा !’
