आरक्षणाची झूल उतरवून ११ नगरसेविका खुल्या प्रभागातून रिंगणात

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांकरिता ५० टक्के आरक्षण ठेवण्याच्या धोरणाचे हळूहळू का होईना, पण चांगले परिणाम दिसू लागले आहेत, कारण गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच आरक्षणाच्या मदतीने महानगरपालिकेत विजयी पाऊल ठेवलेल्या नगरसेविकांपैकी तब्बल ११ जणी या वेळी खुल्या प्रभागातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यातही कुटुंबात राजकारणातील कोणीही पदाधिकारी नसताना किंवा घराण्याचा गड सांभाळण्याची जबाबदारी नसतानाही स्वखुशीने राजकारणात उतरलेल्या तीन महिला नगरसेविका या वेळी खुल्या गटातून लढत देत आहेत.  कागदावरील कामगिरी व प्रत्यक्षातील लढत या दोन्ही पातळ्यांवर महिला नगरसेविकांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहेत.

कोणत्याही दडपणाशिवाय राजकारणात प्रवेश करून आता खुल्या गटातून लढत देत असलेल्यांमध्ये मालाडमधील काँग्रेसच्या नगरसेविका स्नेहा झगडे आणि भांडुपमधील मनसेच्या नगरसेविका अनिषा माजगावकर व वैष्णवी सरफरे यांचा समावेश होतो. शिवसेनेकडून महिलांना प्राधान्य दिले जाण्याची परंपरा या वेळीही कायम असून तब्बल १२ महिला उमेदवार खुल्या प्रभागातून रिंगणात उतरल्या आहेत. गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या रिद्धी खुरसुंगे, मनाली तुळसकर आणि दर्शना शिंदे या शिवसेनेकडून रिंगणात उतरल्या आहेत. बोरिवलीतील रिद्धी खुरसुंगे यांचे पती २००७ मध्ये राष्ट्रवादीकडून नगरसेवक झाले. प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यावर रिद्धी खुरसुंगे रिंगणात उतरल्या. आता ११ क्रमांकाचा प्रभाग पुन्हा खुला झाला तेव्हा मात्र रिद्धी खुरसुंगे यांनी स्वत:च निवडणूक लढवण्याचे ठरवले. कुर्ला येथील मनाली तुळसकर आणि दर्शना शिंदे यांनीही पतीकडून राजकारणाची दीक्षा घेतली, मात्र आता आरक्षण खुले होऊनही पतीऐवजी त्यांनीच पालिका सभागृहात जाण्याची तयारी केली आहे.

भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योती अळवणी या विलेपार्ले येथून, तर लीना शुक्ला या घाटकोपरमधून खुल्या प्रभागात लढत देत आहेत. शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवलेल्या रितू तावडे, उपमहापौर अलका केरकर आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर यादेखील महिलांचे आरक्षण नसलेल्या प्रभागातून उभ्या आहेत.

स्नेहा झगडे

मालाड-गोरेगावच्या सीमेवरील सुंदर नगर, पिरामल नगर हा भाजपचा परंपरागत विभाग. गेल्या वेळी मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षण झाल्यावर इथे उमेदवार शोधणेही इतर पक्षांसाठी कठीण काम होते. स्नेहा झगडे यांचे वडील काँग्रेसशी संबंधित होते, मात्र निवडणुकांपासून हे कुटुंब दूरच होते. स्नेहा झगडे यांच्यामुळे काँग्रेसला पहिल्यांदाच या प्रभागातून विजय मिळाला. २२ वर्षांच्या स्नेहा झगडे या सर्वात कमी वयाच्या नगरसेविकांपैकी एक होत्या.

अनिषा माजगावकर

मनसेची स्थापना झाल्यावर अनिषा माजगावकर सक्रिय कार्यकर्ता झाल्या आणि पाच वर्षांपूर्वी त्यांना भांडुपमधील नरदास नगरमधून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. चेहरा ओळखीचा नसतानाही त्या विजयी झाल्या. आता त्या शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक झालेल्या रमेश कोरगावकर यांना लढत देत आहेत.

वैष्णवी सरफरे

भांडुपमध्ये मनसेच्या पहिल्या कार्यकर्त्यांच्या फळीत वैष्णवी सरफरे होत्या. वडील पूर्वी शाखाप्रमुख असले तरी नंतर त्यांनीही सेनेशी फारकत घेतली होती. पाच वर्षांपूर्वी हनुमान नगर, फरीद नगर प्रभागात महिला आरक्षण आले तेव्हा कोणी तरी उमेदवार हवा म्हणून नोकरी सोडून त्या रिंगणात उतरल्या. मनसेच्या लाटेत निवडूनही आल्या. ज्या भागात काम केले तिथेच खुल्या प्रभागात त्या उभ्या आहेत.