निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना नवी मुंबईतील खारघरच्या हिरानंदानी पुलाखाली आधार कार्ड फॉर्मचा ढीग पडल्याचे आढळले आहे. फॉर्मबरोबरच इतर आवश्यक कागदपत्रे आणि शिफारसपत्रेही येथे आढळली आहेत. या फॉर्मबरोबरच झेरॉक्स कॉपी देखील सापडल्या आहेत. नवी मुंबईतील सायन-पनवेल हायवेवर हिरानंदानी पुलाखाली कागदपत्रे आणि फॉर्मचा ढीग पडला आहे. घाटकोपर, ठाणे, भिवंडी, कल्याण या भागात राहणाऱ्या नागरिकांचे नाव आणि पत्ते या कागदपत्रांवर आहेत. आमदार राम कदम आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिफारसी देखील या काही कागदपत्रांसोबत जोडलेल्या आहेत.

या कागदपत्रांचा आणि निवडणुकीचा काही संबंध तर नाही ना या उद्देशाने पोलीस तपास घेत आहेत. पोलिसांनी ही कागदपत्रे जमा करून घेतली आहेत. ओळखपत्र मिळवून मतदार यादीमध्ये खोटी नाव नोंदणी करणे, ओळखपत्राचा गैरवापर करणे असे प्रकार या काळात होतात त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. दरम्यान, ज्या एजन्सीला आधार कार्डाचे काम देण्यात आले होते त्या एजन्सीने खुलासा केला आहे. हा घातपात किंवा गैरवापराचा प्रकार नसल्याचे एजन्सीचे अधिकारी किरण धात्रे यांनी म्हटले आहे. एका कार्यालमधून दुसऱ्या कार्यालयात कागदपत्रे नेत असताना एक बॅग खाली पडली. ही बाब आम्हाला जेव्हा कळली तेव्हा आम्ही तिथे तातडीने गेलो होतो परंतु पोलिसांनी त्याआधीच ही कागदपत्रे ताब्यात घेतली होती असे धात्रे यांनी म्हटले आहे.