महाराष्ट्रात राष्ट्रवादीमध्ये अजित पवार की सुप्रिया सुळे, या चुलत भावंडांमध्ये नेतृत्वाची नेहमीच चर्चा होत असते. काँग्रेसमध्ये राहुल की प्रियंका गांधी या भावंडांमध्येही अशीच चर्चा होते. राहुलचे नाणे फारसे चालत नसल्याने प्रियंकाने राजकारणात सक्रिय व्हावे, अशी मागणी काँग्रेसजनांकडून केली जाते. त्यातच राहुल गांधी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षात मोठी लॉबी कार्यरत आहे व त्यांच्याकडून प्रियंकाचे नाव पुढे केले जाते. प्रियंका गांधी-वढेरा मात्र फार काही सक्रिय होताना दिसत नाही. आई सोनियाची राहुलने पुढे यावे ही इच्छा असल्याने प्रियंकाचा नाइलाज होत असावा. त्यातच पती रॉबर्ट वढेरा यांनी एवढे उद्योग करून ठेवलेत की प्रियंका थोडय़ा सक्रिय होतात असे चित्र जरी निर्माण झाले तरी भाजप सरकार रॉबर्ट यांच्याविरोधात कारवाईची पाऊले उचलतील. ही भीती लक्षात घेता काँग्रेस नेतृत्व प्रियंकाबाबत सावधतेनेच पावले टाकत आहे. रायबरेली आणि अमेथी या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या प्रचार सभांमध्ये प्रियंका सहभागी होणार का, याबाबतही अजून संभ्रमाचे वातावरण आहे. अजून तरी प्रियंकाच्या प्रचाराचे नियोजन झालेले नाही. मात्र पक्षाच्या दिल्लीतील वॉर रुममध्ये प्रियंका दररोज हजेरी लावतात. उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थिती, पक्षाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांचा आढावा घेतात. दररोज तीन-चार तास बसून सूचना करतात किंवा नेत्यांकडून माहिती घेतात. निवडणुकांच्या नियोजनाचे धडे घेत असल्याचे प्रियंकांकडून सांगण्यात येत असले तरी ही भविष्यातील राजकीय वाटचालीची तयारी तर नाही ना, अशी शंका साहजिकच उपस्थित होते.

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

ई. पलानीसामी यांच्या शपथविधीमुळे तामिळनाडूतील राजकीय अस्थिरता अखेर संपुष्टात आली. दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा होतो हे म्हणतात ते तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीसामी यांच्याबाबत तंतोतंत लागू होते. जयललिता यांच्या मृत्यूनंतर पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. शशिकला यांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यातून वाद निर्माण झाला. शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांच्यात नेतृत्वावरून वाद सुरू झाला. त्यातून आठवडाभर तामिळनाडूत गोंधळ झाला. शशिकला समर्थक आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढावी, असे प्रयत्न सुरू होते. त्याला यश नव्हते. तेवढय़ात सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शशिकला यांना दोषी ठरविल्याने सुंठीवाचून खोकला गेला. शशिकला आपोआपच बाद झाल्या. आपल्या विश्वासातील नेत्याकडे मुख्यमंत्रिपद राहावे म्हणून पलानीसामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांच्यातील वादात पलानीसामी यांचा फायदा झाला. राजकारणात कधी कोणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही व त्याचे उदाहरण म्हणजे पलानीसामी हे आहेत.