इंटरव्ह्य़ू संपवून घरी आलेल्या मोरूने काळी टोपी काढून खुंटीवर टांगली. कपाळावरचा केशरी टिळा पुसून टाकला. उमेदवारी मिळेल अशी त्याला खात्री होती, पण इंटरव्ह्य़ू देऊन बाहेर पडल्यानंतर आत जाणाऱ्या नवख्या इच्छुकाचा फुगलेला खिसा पाहून त्याच्या मनात पाल चुकचुकली होती.

‘आपण फक्त बायोडेटा नेला होता.. बाकी नेण्यासारखे काहीच आपल्याकडे नव्हते!’ मोरूने स्वत:चीच समजूत काढली. पण आशा सोडायची नाही, असेही त्याने ठरवले. मोबाइलवर कुठलाच मिसकॉल वगैरे नव्हता. मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहत मोरूने एक सुस्कारा सोडला आणि त्याने घडय़ाळाकडे पाहिले. शाखेवर जायची वेळ झाली होती. खुंटीवरची टोपी डोक्यावर घातली आणि तो बाहेर पडला.

घरी परतल्यावर त्याने पुन्हा मोबाइल तपासला. फोन आलाच नव्हता. मोरूने पक्षाच्या उमेदवारीची आशा सोडली, आणि स्वत:शीच काही तरी निश्चय केला. भराभरा काही जणांना फोन केले आणि आपला निर्णय सांगून टाकला.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात लढण्याचा त्याचा निर्णय ऐकून स्वयंसेवक बंधूही खूश झाले होते.. मोरूने समाधानाने फोन बाजूला ठेवला, आणि दुसऱ्याच क्षणाला फोन खणखणू लागला.

मोरू बंडखोरी करणार ही बातमी एव्हाना पक्षाच्या कार्यालयात पोहोचली होती. अध्यक्षांचाच फोन होता. मोरूने असे काही करू नये, तो निष्ठावंत स्वयंसेवक असल्याने बंडखोरी केली, तर पक्षाला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणता येईल का असा थेट सवालच अध्यक्षांनी मोरूला केला, आणि मोरूची चलबिचल झाली..

‘बंड केलेस तर इतर पक्षांत आणि आपल्यात फरक काय राहिला?’ पलीकडचा अध्यक्षांचा आवाज मोरूच्या कानात घुमला.

‘मला विचार करायला वेळ हवा’.. कसेबसे बोलून मोरूने फोन बंद केला. पुन्हा स्वयंसेवक बंधूंशी फोनवर चर्चा झाली, आणि निर्णय झालाच. ‘काहीही झाले तरी माघार नाही!’..

दुसऱ्या दिवशी मोरूने उमेदवारी जाहीर केली. लगोलग, इतर काही बंधूदेखील रिंगणात उतरणार अशा बातम्या सुरू झाल्या.

पार्टीत चिंतेचे वातावरण पसरले. अध्यक्षांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

‘कसा सोडवायचा हा तिढा?’.. त्यांनी प्रवक्त्याला विचारले, आणि मनातला आनंद चेहऱ्यावर दिसू न देता, प्रवक्त्याने काळजीने मान हलविली.

‘आता एकच मार्ग.. वरूनच काही करता आले तर पाहायचे’.. प्रवक्त्याने अंग काढून घेतल्याच्या सुरात उपाय सांगितला, आणि समोरच्या कागदावरील आकडेमोडीत मान खुपसली.

अध्यक्षांनी तातडीने फोन फिरवला. पलीकडून प्रथेप्रमाणे नम्र नमस्कार ऐकू येताच अध्यक्षांचा चेहरा उजळला.

‘दादाजी, बंडाच्या भाषा सुरू झाल्या संघटनेत. अशाने पक्षाला फटका बसेल.. तुम्ही काही तरी सांगून बघा’.. अध्यक्षांनी विनम्र आवाजात पलीकडच्या व्यक्तीला सांगितले. काही क्षण केवळ पलीकडून काही तरी बोलणे सुरू होते. अध्यक्षांनी समाधानाने मान हलविली, आणि फोन बंद करून ते स्वत:शीच हसले.

संध्याकाळी मोरू शाखेवर गेला. आज विशेष बौद्धिकाचे आयोजन करण्यात आले आहे, असा निरोप मोरूला मिळाला होता. अपेक्षेप्रमाणे ते सुरू झाले, आणि मोरू दंग होऊन ऐकू लागला.

‘मातृभूमीला परंवैभवाप्रति नेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, आता सारी शक्ती पणाला लावून या कामासाठी सर्वानी एकवटून झोकून दिले पाहिजे’.. मोरूच्या नजरेसमोर बंडखोरीचा निर्णय वेडावाकडा नाचू लागला होता..

बौद्धिक संपले, आणि बंडाची भाषा करणाऱ्यांना समोर बसवून चर्चा सुरू झाली.

‘निवडणुका लागल्या आहेत. आपल्या बांधवांच्या विजयासाठी झटून कामाला लागायचे आहे. उद्या सभा, प्रचार सुरू होईल. तेव्हापासून मतदानापर्यंत साऱ्या जबाबदाऱ्यांचे वाटप आजच करावयाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या परिसरातील किमान शंभर मतदारांशी संपर्क साधला, तर आपल्या उमेदवाराचा विजय नक्की होईल. बूथवरील जबाबदाऱ्याही आजच नक्की करून टाकू. मतदानाच्या दिवशी, बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकरिता प्रत्येक घरातून दहा पोळ्या व भाजी जमा करावी लागेल.. त्याचे वाटप वेळेवर झाले पाहिजे’..

मोरूच्या कानात बौद्धिक साचत गेले, आणि मोरूने यांत्रिकपणे मान हलविली.

‘मी पोळीभाजी जमा करून वाटप करेन’.. मोरू उत्साहाने म्हणाला, आणि बौद्धिकप्रमुखांनी समाधानाने मोरूकडे पाहिले.

घरी आल्यावरही डोक्यावरची टोपी खुंटीला टांगायचे त्याच्या लक्षातच आले नव्हते!