मनसे नगरसेवकाच्या कार्यअहवालात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन; निवडणूक आयोगाकडे तक्रार

कार्यअहवालात बाळासाहेबांच्या छायाचित्राला अभिवादन करतानाचा फोटो दादर येथील मनसे नगरसेवकाने प्रसिद्ध केल्यामुळे स्थानिक शिवसेना शाखाप्रमुखांनी पोलिसांकडे तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या लढाईत स्थानिक सेना-मनसे वाद उफाळून आला आहे.

दादर रेल्वे स्थानक परिसरातील पूर्वीच्या १८४ वॉर्डमधील मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी गेल्या पाच वर्षांतील कामाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात सुरुवातीलाच प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे, बाळासाहेब ठाकरे तसेच मीनाताई ठाकरे यांची छायाचित्रे देण्यात आली असून ४० पानांच्या या अहवालात अखेरच्या पानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करतानाचे छायाचित्र छापण्यात आले आहे. शिवसेनेच्या संस्थापकांची छायाचित्र छापल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार केली जाणार आहे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी मनसेने त्यांच्या छायाचित्रांचा वापर करू नये असे ठणकावले होते. मनसेच्या उमेदवारांना आता पराभव समोर दिसत असल्याने बाळासाहेब व मासाहेबांची छायाचित्रे कार्यअहवालावर लावून ते मतांचा जोगवा मागत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याने आम्ही दादर पोलिसांकडे पत्र दिले असून निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे, असे दादर फुलबाजार येथील शिवसेना शाखा क्रमांक १९२ चे शाखाप्रमुख यशवंत विचले म्हणाले. त्याचप्रमाणे स्नेहल जाधव व सुधीर जाधव यांच्याकडून हळदीकुंकू व वाण असलेल्या पिशव्यांचे घरोघरी होत असलेले वाटपही आचारसंहितेचा भंग आहे, त्याबाबतही तक्रार केली आहे, असे विचारले यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख लोकनेते आहेत. त्यामुळेच त्यांच्या स्मारकासाठी पालिकेने एवढी मोठी जागा दिली. ते फक्त सेनेचे नाहीत. अब्दुल कलाम, ज्योतिबा फुले यांच्यासोबत मी त्यांचे छायाचित्र छापले, यात काय चुकले, असा प्रश्न सुधीर जाधव यांनी उपस्थित केला. शस्त्रसंग्रहालयालाही  राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव दिले आहे. त्याला सेनेने विरोध केला नाही. पण स्थानिक कार्यकर्त्यांना समजत नाही. नगरसेवक पद गेले तरी चालेल पण मी बाळासाहेबांना हृदयातून काढणार नाही, असेही जाधव म्हणाले.