निवडणूक जवळ येऊन ठेपली तरी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये गुरूदास कामत आणि संजय निरूमप गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यावेळीही दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणमारीही झाली. त्यामध्ये एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला असला तरी आगामी काळात हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

निरूपम यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत गुरूदास कामत यांनी महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या वादात मध्यस्थी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतून भूपिंदरसिंग हुड्डा यांना पाठवले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर आज भूपिंदरसिंग हुडा यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांना मध्यस्थीसाठी पाचारण केले होते. मात्र, यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार बाचाबाची झाली. शाब्दिक बाचाबाचीमुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. या यादीमध्ये गुरुदास कामत यांच्या उत्तर -पश्चिम मतदारसंघातील प्रभागात एकालाही तिकीट देण्यात आले नव्हते. तसेच कांदिवलीमध्ये राहणा-यांना चारकोपमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीवर निरुपम गटाचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आला असतानाच मंगळवारी संध्याकाळी मुंबई काँग्रेसकडून ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.  यामध्ये विरोधी पक्षनेत्यासह १९ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये ९६ नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. मात्र, आता या यादीत काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनाच संधी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यादीत आजी-माजी नगरसेवकांच्या पत्नी, वहिनी, मुलगी आणि मुलगा यांचा भरणा आहे. पक्षातील अंतर्गत वाद आणि बंडखोरी थोपविण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबातच तिकीटे देण्यात आल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय  निरुपम आणि माजी खासदार गुरुदास कामत यांच्यातील वाद उफाळून आला होता. या वादामुळे काँग्रेसमधून ७ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी  दिली आहे.