गेल्या ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांच्या किसान यात्रेच्या समारोपप्रसंगी हरयाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक तन्वर यांना झालेल्या मारहाणीला जबाबदार असणारे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्याकडे मुंबई काँग्रेसमधील गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यातील वाद मिटविण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला चोप देणारे व याबाबत पक्षाने चौकशी केलेल्या हुड्डा यांच्यासारख्याच नेत्याला मुंबईत पाठविणे हा मोठा विनोद असल्याचे पक्षातच बोलले जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून अलिप्त राहण्याचे अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुरुसाद कामत यांनी जाहीर केले. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला फारसे आशादायी वातावरण नसताना कामत यांच्यासारखा नेता पक्षापासून दूर राहणे केव्हाही फायदेशीर ठरणारे नाही. यातूनच कामत यांच्या नाराजीची दखल घेत पक्षाने हरयाणाचे माजी मुख्यमंत्री हुड्डा यांच्याकडे मुंबई काँग्रेसमधील वाद मिटविण्याची जबाबदारी सोपविली आहे. हुड्डा यांच्या उपस्थितीत गुरुवारी दोन्ही गटांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. हुड्डा हे दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.

आपल्या तक्रारीची दखल घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हुड्डा यांना मुंबईत पाठवीत असल्याचे कळविल्याचे कामत यांनी म्हटले आहे. कामत यांनी संजय निरुपम यांच्यासह मोहन प्रकाश यांच्यावरही टीकेची झोड उठविली आहे.

प्रदेशाध्यक्षाला मारहाण आणि हुड्डांची चौकशी

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांच्या किसान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या समारोपप्रसंगी दिल्लीच्या सीमेवर हरयाणा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक तन्वर यांना पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली. चोप देण्यात आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ही मारहाण माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या समर्थकांनी केली होती. या प्रकरणी हुड्डा यांच्या काही निकटवर्तीयांना अटकही झाली होती. हरयाणामध्ये माजी मुख्यमंत्री हुड्डा आणि प्रदेशाध्यक्ष तन्वर यांच्यातून विस्तवही जात नाही. तन्वर यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली होती.तन्वर यांना झालेल्या मारहाणीची काँग्रेसने गांभीर्याने दखल घेतली होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची एक सदस्यीय चौकशी समितीने या मारहाणीची चौकशी करण्यासाटी नेमण्यात आली होती. शिंदे चंदिगडमध्ये चौकशीला गेले असता हुड्डा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत तन्वर यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. असे हे हुड्डा मुंबईत येऊन कामत आणि निरुपम यांच्यात समेट घडविणार आहेत.