हुड्डांसमोर कामतांचा तक्रारींचा पाढा

मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पाश्र्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आलेले हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्यासमोर गुरुदास कामत गटाच्या नेत्यांनी तक्रारींचा पाढा वाचत, उमेदवारी वाटप करताना सर्वाना विश्वासात घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास मुंबईत काँग्रेसला फटका बसू शकतो, असा निष्कर्ष नेतेमंडळींच्या बैठकीत काढण्यात आला. तसेच राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची झाल्यास ३० पेक्षा जास्त जागा सोडू नयेत, असेही मत मांडण्यात आले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाने नेमलेले निरीक्षक हुड्डा तसेच राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सर्व संबंधितांशी चर्चा केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरुद्ध कामत यांनी शड्डू ठोकला आहे. निरुपम हे मनमानी करतात, सर्वाना विश्वासात घेत नाहीत, पक्षात पारदर्शक कारभार नाही, असा तक्रारींचा सूर कामत गटाच्या नेत्यांनी लावला.  उमेदवारी देताना वाद झाल्यास आपण मध्यस्थी करू, असे आश्वासन हुड्डा यांनी दिले. हा निरुपम यांना धक्का असल्याचा अर्थ विरोधी गटाने काढला.

काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी हुड्डा यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन निरुपम यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या. निरुपम यांनी कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास आपण प्रचार व निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहू, या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला.  शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यास काँग्रेसचा पर्याय लोकांसमोर राहील, पण युती तुटली तर त्याचा फटका काँग्रेसला बसेल, यावर चर्चा करण्यात आली. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीबरोबर झालेल्या आघाडीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतही सपाबरोबर आघाडी करता येईल का, याची चाचपणी केली जाणार आहे.