मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी भाजपकडून १९५ उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मराठी उमेदवार आणि महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. १९५ उमेदवारांच्या यादीतील ११७ उमेदवार मराठी आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरूवारी रात्री उशिरा ही यादी जाहीर केली. तर दुसरीकडे बुधवारी शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर सुरू झालेले बंडखोरीचे सत्र अजूनही कायम आहे. कालच विद्यमान नगरसेवक नाना अंबोले आणि दिनेश पांचाळ यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभादेवीमध्येही आज एक बंडाळी समोर आली आहे. प्रभादेवीतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना तिकीट दिल्याने शिवसेनेचे नाराज महेश सावंत यांनी त्याविरोधात बंड पुकारले आहे. महेश सावंत हे प्रभादेवी वॉर्ड १९४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे प्रभादेवी विभागात शिवसेनेचाच अंतर्गत सामना रंगणार आहे. दादर, माहिम, प्रभादेवी हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. यापैकी दादर विभागातील सात जागांवर गेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता. यावेळीही शिवसैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असल्याने मतांच्या विभागणीमुळे शिवसेनेला फटका बसू शकतो. काल रात्री उशीरापर्यंत मातोश्रीवर सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वाटाघाटी सुरु होत्या. मात्र, मातोश्रीने समाधान सरवणकर यांच्या पारड्यात दान टाकल्याने महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा ओक दादरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्या निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्याजागी वॉर्ड क्र. १९१ मधून डॉ. तेजस्विनी जाधव निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय, वॉर्ड क्र. १९० माहिममध्ये शिवसेना महिला  शाखासंघटक  रोहिता महेंद्र ठाकुर या अपक्ष निवडणूक लढणार आहेत. ठाकुर यांना डावलून आमदार आणि विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी माजी उपविभाग प्रमुख राजु पाटणकर यांच्या पत्नी तृप्ती पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने ठाकूर नाराज झाल्या. त्यामुळे त्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबतची युती तोडून स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेतच आता पक्षांतर्गत युद्ध सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब करताच, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. विभागप्रमुखांच्या कुटुंबीय, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि वर्षांनुवर्षे नगरसेवकपदी राहिलेल्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील इच्छुकांसह काही शाखाप्रमुख व कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. किमान तीन ठिकाणी शिवसैनिकांनी तीन ठिकाणच्या शाखांना टाळे ठोकत आपला संतात व्यक्त केला.