सुधाकर चव्हाण यांचा प्रवेश बारगळला; कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

उल्हासनगरमध्ये ओमी कलानीशी केलेल्या युतीच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात शिवसेनेशी टक्कर घेण्यासाठी ठाणे पालिका बस खरेदी घोटाळ्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या टाडा फेम नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी चाप लावला आहे. ठाण्यातीलच आमदार, संघाचे कार्यकर्ते तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात गुंडांना प्रवेश देऊ नका अशी मागणीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याने, सुधाकर चव्हाण यांच्यासह एकाही गुंडाला भाजपत प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले खासदार कपिल पाटील तसेच मनसेतून भाजपत गेलेले माजी आमदार रमेश पाटील हे सुधाकर चव्हाण यांच्या भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील होते. चव्हाण यांच्यावर बिल्डर सूरज परमार याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून ठाणे महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. मनसेचे नगरसेवक असतानाच चव्हाण यांची राज ठाकरे यांनी मनसेतून हकालपट्टी केली होती. तेव्हापासून भाजपमध्ये जाण्यासाठी ते प्रयत्नशील होते. ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास ठाण्यातील भाजपच्या अनेक जागा पडतील, असे सांगत आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्याला पक्षात घेण्यास विरोध नोंदवला. भाजपचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही त्याला पक्षात घेऊ नये, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले असून ठाण्यातील संघ तसेच भाजपच्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी सुधाकर चव्हाण यांच्यासह गुंडांना प्रवेश देण्यास विरोध करणारे एसएमएस मुख्यमंत्र्यांना पाठवले आहेत. हे गुंड निवडून येतील मात्र भाजपचे चांगले उमेदवार यामुळे पडतील, असे मत संघाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले.

गुंडांना प्रवेश दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमाही मलिन होईल, अशी भीतीही अनेक कार्यकर्त्यांनी एसएमएसद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली असून आपण चव्हाण याच्यासह एकाही दाखलेबाज गुंडाला प्रवेश देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ‘एसएमएस’च्या उत्तरात स्पष्ट केले तसेच संजय केळकर यांनाही सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नगरसेवक मकरंद नार्वेकर, आसीफ भामला भाजपमध्ये

सिटीझन फोरमचे काम करणारे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसीफ भामला यांच्यासह काही नेत्यांनी भाजपमध्ये मंगळवारी प्रवेश केला. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते. त्याचबरोबर युवा सेनेच्या कोअर समितीतील स्वप्नील येरुणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत रेळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.