फोडा व झोडा धोरण राबवून आपल्याच मित्रपक्षांमध्ये भाजप फूट पाडत आहे. ते आमच्याच हितांवर टाच देत आहेत. म्हणून तर राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकविल्याशिवाय गप्प राहणार नसल्याची भाषा मित्रपक्षाच्या एका नेत्याने येथे केली.

गेल्या काही महिन्यांतील घडामोडींनी खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम या छोटय़ा मित्रपक्षांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. ‘कमळ’ चिन्ह घेऊन लढणाऱ्या आपल्या काही उमेदवारांना आठवलेंनी तडकाफडकी निलंबित केल्याचा दाखला देत एका मित्रपक्षाचा एक नेता आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर म्हणाला, ‘आमच्यातच भांडणे लावण्याचा भाजप जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय.

मेटे यांच्याविरुद्ध मराठा संघटनांना भडकावून त्यांच्याकडून शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. खासदार शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांच्यामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्यासाठी न मागता खोतांना पाणीपुरवठा व स्वच्छता खाते देण्यात आले. नंतर खोतांच्या भाजपप्रवेशाच्या बातम्या पेरल्या गेल्या. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पंधरा जिल्हाध्यक्षांना फूस लावून भाजपने आपल्या पंखाखाली घेतले आहे.

रिपब्लिकन पक्षामध्ये आठवले आणि अविनाश महातेकर यांच्यासारख्या नेत्यांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज घडविले जात आहेत. आता तर त्यांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर लढायला भाग पाडून थेट पक्षच उघड उघड पळविण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण तो आठवलेंनी कणखरपणाने उधळला ते बरेच झाले. जशास तसे वागल्याशिवाय भाजपला शहाणपणा येणार नाही.’