भाजपच्या प्रचार फलकावर मोदींच्या जोडीला ‘पप्पू’; आरपीआयच्या उमेदवारांचे भाजपकडून ‘अपहरण’

भाजपबरोबर काडीमोड घेऊनही राज्यात सत्तेत मात्र एकत्र नांदणारी शिवसेना, या दोन्ही पक्षांत बंडखोरीला आलेले उधाण, काँग्रेसमधील हाणामाऱ्या आणि निवडणूक रिंगणातील ‘गुंड’गर्दी.. या सर्व सावळ्या गोंधळात भर पडली आहे ती रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या पळवापळवीची. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर पालिकेत रिपाइंच्या तब्बल १७ उमेदवारांना भाजपने कमळ चिन्ह देऊन निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे चिडलेले रिपाइं नेते, भाजपने युतीचा धर्म पाळला नाही, अशी आरडाओरड करीत आहेत. मुंबईतील त्यांची भाजपबरोबरची युती मात्र कायम आहे. एकीकडे हे युती-संशयकल्लोळ नाटय़ रंगलेले असतानाच, उल्हासनगरमध्ये भाजपच्या ‘प्रतिमा-गोंधळा’चा अंक रंगला आहे. तेथे भाजपने कुख्यात गुंड पप्पू कलानीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत आणून बसविले आहे. भाजपच्या प्रचारफलकांवर मोदींच्या सोबत कलानीची छबी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता आपली पारदर्शक छबी वाचविण्यासाठी भाजप नेत्यांची धावपळ उडाली असून, ‘या फलकाबाबत आपणास कल्पना नाही. माहिती घेऊन सांगतो,’ अशी प्रतिक्रिया देत भाजपच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणी हात झटकण्याचे प्रयत्न केले आहेत.

उल्हासनगरमध्ये कलंकित नेते पप्पू कलानी यांना चार हात लांब ठेवत असल्याचा आव आणत त्यांचे पुत्र ओमी यांच्यासोबत आघाडीचा डाव खेळणाऱ्या भाजपने निवडणुकीच्या प्रचारफलकांमध्ये मोदी यांच्यासोबत पप्पू कलानीचेही छायाचित्र वापरल्याने पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपमधील एका मोठय़ा गटाच्या ‘सदिच्छे’मुळे कलानी-भाजप यांची हातमिळवणी झाल्याचे सांगितले जाते. कलानीबरोबरच्या आघाडीतील उमेदवारांनी भाजपचेच चिन्ह निवडल्याने ही ‘टीम ओमी’ भाजपमध्येच विलीन झाल्याचे चित्र दिसत आहे. यावरून पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांत खदखद असतानाच आता पक्षाच्या निवडणुकीतील प्रचारफलकांवर पप्पू कलानीचेही छायाचित्र झळकू लागले. त्यानंतर आता भाजपने सावध भूमिका घेतली आहे. असे असले तरी पप्पू कलानीचे छायाचित्र असलेले बॅनर समाजमाध्यमातून आजही प्रसारित केले जात असून अनेक प्रभागांमध्ये आघाडीच्या आणि भाजपच्या संयुक्त बॅनरवरही पप्पू कलानीचे छायाचित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ओमी कलानी यांची आई व राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदार ज्योती कलानी याही टीम ओमीच्या उमेदवारांसोबत थेट भाजपच्या प्रचार फलकांवर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असताना भाजपच्या काही उमेदवारांनीही ‘पप्पू’ नावाजा गजर सुरू केला आहे.

आरपीआय-भाजप मुंबईत मित्र, इतरत्र विरोधक

उल्हासनगरमध्ये कलानीशी ‘युती’ करणाऱ्या भाजपने पुणे, पिंपरी-चिंचवड व सोलापूर मध्ये आरपीआय या आपल्या मित्रपक्षाला चांगलाच झटका दिला आहे. तेथे भाजपने कमळ चिन्ह देऊन रिपाइंच्या १७ तगडय़ा उमेदवारांना निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ आरपीआयवर आली असून, आता भाजपशी युती फक्त मुंबईपुरतीच राहील, अशी घोषणा पक्षाने केली आहे. एकंदर रिपब्लिकन पक्ष मुंबईत भाजपबरोबर आणि अन्य ९ महापालिकांमध्ये भाजपविरोधात असा नवाच गोंधळअध्याय आता सुरू झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून मुंबईतील आरपीआयच्या वाटय़ाला आलेल्या सहा जागांवर भाजपचे उमेदवार आहेत, त्याबाबतचा घोळ अजून मिटलेला नाही. त्यामुळे मुंबईतील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.