20 September 2020

News Flash

गाणारांच्या विजयाचे रहस्य भाजपच्या ‘संघा’मध्ये!

हा मतदारसंघ हा तसा विदर्भ माध्यमिक शिक्षक (विमाशि) संघाचा बालेकिल्ला.

गत सहा वर्षांतील निष्क्रिय कामगिरीनंतरही शिक्षक परिषदेच्या नागो गाणार यांना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या आर्थिक आणि संघटनात्मक पाठबळामुळे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता आला. नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गाणार यांचा विजय भाजपसाठी मनोबल उंचावणारा ठरला आहे.

हा मतदारसंघ हा तसा विदर्भ माध्यमिक शिक्षक (विमाशि) संघाचा बालेकिल्ला. संघाचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी सलग तीन वेळा म्हणजे तब्बल १८ वर्षे याचे प्रतिनिधित्व केले. मागील निवडणुकीत त्यांचा पराभव करून परिषदेचे गाणार विधान परिषदेत गेले होते. गाणार यांच्या या विजयामागे डायगव्हाणेंच्या विरोधात त्या वेळी उफाळलेला असंतोष प्रमुख कारण ठरला होता. मात्र नंतरच्या सहा वर्षांत गाणार यांची शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेतील कामगिरी निष्क्रिय अशीच राहिली. त्यामुळे या निवडणुकीत सुरुवातीला परिषदेतूनच गाणार यांच्या उमेदवारीला विरोध होता. काहींनी बंडखोरीही केली. संघाचा पाठिंबा असल्याचा दावा करून संजय बोंद्रे रिंगणात उतरले. भाजपची भूमिकाही गाणारांबाबत सुरुवातीला तळ्यातमळ्यातच होती; पण गाणारांशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्यावर भाजपने त्यांना पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर संघटनात्मक शक्ती आणि निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक बळही त्यांना उपलब्ध करून दिले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन भाजप कार्यकर्त्यांना गाणार यांना निवडून आणण्यासाठी कामी लावले. एवढेच नव्हे तर या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांतील पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांनासुद्धा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला कमकुवत वाटणारी गाणार यांची उमेदवारी नंतरच्या टप्प्यात मात्र प्रभावी ठरली. गाणारांविरुद्ध निर्माण झालेला असंतोषही दूर करण्यात पक्षाच्या नेत्यांनी मोलाची भूमिका बजावली.

अगदी याउलट विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे झाले. डायगव्हाणे पराभूत झाल्यानंतर संघटनेची या मतदारसंघावरील पकड ढिली पडली. या वेळी संघटनेत बंडखोरी नव्हती. झाडून सर्व नेते एक झाले; पण गाणार यांच्या विरोधातील मते संघटनेचे उमेदवार आनंद कारेमोरे यांच्याकडे वळविण्यात विमाशिला अपयश आले. कारेमोरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. एरव्ही विमाशिच्या सोबत राहणाऱ्या काँग्रेसने या वेळी स्वतंत्र उमेदवार दिला. त्याचाही फटका कारेमोरेंना बसला.

या निवडणुकीतील राजकीय पक्षांचा सहभाग हा चर्चेचा विषय ठरला होता. भाजपने नेहमीच शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील राजकारण केले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे या क्षेत्रातील राजकारण आतापर्यंत विमाशिच्या माध्यमातूनच चालले होते. डायगव्हाणे यांचा या मतदारसंघातील तीन वेळा झालेल्या विजयातही काँग्रेसचा वाटा होता. या वेळी काँग्रेसने अनिल शिंदे यांना उमेदवारी देऊन अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच मदत केली. अनिल शिंदे हे शिक्षक नव्हे तर संस्थाचालकांचे प्रतिनिधी होते. त्यांचा प्रभाव हा चंद्रपूर जिल्ह्य़ापर्यंतच मर्यादित राहिला. शिंदेच्या उमेदवारीवर काँग्रेसचा शिक्षक सेलही नाराज होता. भाजपचा विरोध म्हणून शिवसेनेने प्रथमच या निवडणुकीत उडी घेत माजी खासदार प्रकाश जाधव यांना रिंगणात उतरविले; पण ते कुठलाही प्रभाव पाडू शकले नाहीत.

शिक्षक भारतीची मुसंडी

या मतदारसंघात शिक्षक भारतीने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली. संघटनेचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची (७१९९) मते घेतली. या मतदारसंघाचा इतिहास पाहता येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना आणि शिक्षक परिषद यांच्यातच आतापर्यंत लढत होत आली आहे. या वेळी शिक्षक भारती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला मागे टाकत तिसरी ताकदवान संघटना म्हणून पुढे आली आहे. शिक्षक भारती ही आमदार कपिल पाटील यांच्या लोकभारती या राजकीय पक्षाची शिक्षक आघाडी आहे. झाडे यांच्या प्रचारार्थ पाटील यांनी येथे दौरा केला होता हे येथे उल्लेखनीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:41 am

Web Title: bjp in nagpur municipal elections
Next Stories
1 अन्य पक्षांना सोबत घेण्याचे सेनेचे मनसुबे!
2 मराठवाडय़ातील प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना बेदखल!
3 भाजपला धडा शिकविण्याचे दुखावलेल्या मित्रांचे मनसुबे
Just Now!
X