शिवसेनेला पुन्हा चिमटा; युतीबाबत अद्याप निर्णय नाही

महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असतानाच भाजपने स्वतंत्रपणे जाहीरनामा बनवण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतील कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपने स्वतच्या जाहीरनाम्याला पारदर्शक हे विशेषण चिकटवत सेनेला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. गेल्या निवडणुकांमध्येही सुरुवातीला वेगळे जाहीरनामा प्रसिद्ध करून नंतर सेना व भाजपने युती केली होती.

महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अजूनही सेना व भाजप युतीबाबत निर्णय झालेला नाही. दरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समितीची बठक दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात शुक्रवारी पार पडली. या जाहीरनाम्यात नागरिकांच्या मागण्यांचाही समावेश करण्याबाबत एकमत झाल्याने आता सामाजिक माध्यमांद्वारे जनतेच्या सूचना मागवण्यात येणार आहेत. पाच वर्षांपूवी, २०१२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्येही शिवसेना व भाजपाने वेगळे जाहीरनामा प्रसिद्ध केले होते. मात्र निवडणुकीत युती झाली होती.

मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्याअनुषंगाने महापालिका निवडणूक पारदर्शी कारभाराचा अजेंडा घेऊन लढणार असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांच्याही अपेक्षा जाणून घेण्याचे भाजपाने निश्चित केले असून त्यासाठी ईमेल आणि ट्विटर वर स्वतंत्र अकाऊंट तयार केले आहे. या माध्यमातून येणाऱ्या जनतेच्या सूचना, अपेक्षा लक्षात घेऊन जाहीरनाम्याचा मसुदा अंतिम करण्यात येईल, अशी माहीती या समितीचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिली. त्यासाठी pardarshimumbai@gmail.com ट्विटर अकाऊंट @pardarshimumbai, फेसबूक  Pardarshi Mumbai यांवर नागरिकांना सूचना देता येतील.