मुख्यमंत्री आज दिल्लीत, पक्षश्रेष्ठींशीही चर्चेची शक्यता;  शिवसेना-भाजपमधील कोंडी कायमच

महापौरपद शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी राजकीय खेळी करीत संघर्ष करण्यावरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असून ‘मुंबईच्या महापौरपदासाठी सरकार पणाला लावायचे का’ यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही द्विधा मन:स्थितीत आहेत. तर हा केवळ महापौरपदाचा मुद्दा नसून भाजप शिवसेनेला संपवायला निघालेली असल्याने अस्तित्वाच्या प्रश्नासाठी शिवसेना निकराच्या संघर्षांच्या पवित्र्यात आहे.

भाजपच्या मदतीशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, हा शिवसेनेचा निर्धार असून उभयपक्षी कोंडी पुढील काही दिवस तरी कायमच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत जात असून शिवसेनेबरोबरचा गुंता कसा सोडवायचा, याबाबत त्यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यात भाजपने स्वबळावर घवघवीत यश मिळविले व मुंबईतही शिवसेनेला दणका दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काळा पैसा व भ्रष्टाचारावरूनही हल्ला केला, तर किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांची मालमत्ता व बोगस कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबत सवाल केले. हे घाव वर्मी लागल्याने व भाजप शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी पावले टाकत असल्याने शिवसेनाही टोकाचा संघर्ष करण्याच्या मन:स्थितीत आहे. मुंबईच्या महापौरपदाचाच केवळ प्रश्न नसून २०१९ मध्येही स्वबळावरच निवडणुका लढविल्या जातील. त्या वेळीही भाजप-शिवसेनेतच प्रमुख लढत होईल. त्यामुळे शिवसेनेची ताकद दाखवून देऊन ती वाढवत नेण्याची शिवसेनेची रणनीती आहे.

तर शिवसेनेला निवडणुकीत दिलेला दणका पुरेसा आहे. मुंबईचे महापौरपद हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यास ते शिवसेनेला डिवचल्यासारखे होईल आणि तसे झाल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास शिवसेना मागेपुढे बघणार नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकारला पणाला लावून एक महापौरपद मिळविण्यापेक्षा शिवसेनेशी तडजोड करावी, अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी ज्येष्ठ मंत्र्यांची आहे. तर पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्री फडणवीस मात्र शिवसेनेला अद्दल घडविण्याची हीच वेळ असल्याच्या भूमिकेत आहेत.

शिवसेना मात्र महापौरपद आपल्यालाच मिळेल, असा दावा करीत असून काँग्रेसने उमेदवार दिल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवसेनेला होईल. मनसेची मदत शिवसेनेला होण्याची शक्यता असून खरी लढत सेना-भाजपमध्येच होईल.

मात्र भाजप उमेदवार उभा करणार का, याबाबत अजून निर्णय झालेला नसल्याचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले. त्यामुळे महापौरपदावरून सध्या तरी तिढा कायमच आहे.

फडणवीस आज अमित शहा यांना भेटणार

पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री मंगळवारी दिल्लीत जात असून ते अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करण्याची  शक्यता असल्याचे समजते. राज्यातील निकालांबाबत त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे झाले आहे. शिवसेनेबरोबरच्या रणनीतीबाबत शहा यांच्याशी फडणवीस यांची नियमितपणे चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबतही मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे.