प्रत्येक प्रभागात पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उघडण्याचा धडाका

शिवसेनेची मुख्य ताकद सर्वत्र विस्तारलेल्या शाखांमध्ये असून त्याचा ‘सामना’ करून जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने आता मुंबईत प्रत्येक प्रभागात कार्यालये उघडण्याचा धडाका लावलेला आहे. भाजपचा विस्तार करायचा असेल तर शिवसेनेचे खच्चीकरण करणे आवश्यक असल्याने शाखांची ताकद खिळखिळी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. महापालिका निवडणुका पार पडल्यावरही निम्म्याहून अधिक कार्यालये सुरू ठेवली जाणार असून पुढील लोकसभा व विधानसभेची पायाभरणी या माध्यमातून केली जाईल.

शिवसेनेचा शाखांच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद होतो. कोणत्याही अडीअडचणींवर मार्ग काढण्यासाठी व मदतीसाठी अनेकदा लोक शाखांमध्ये जातात, विभागप्रमुखांशी संपर्क साधतात. घरमालकांचा त्रास, धमक्या, वैद्यकीय मदत आदी सर्व प्रकारच्या अडचणींसाठी लोक धाव घेतात व त्यावर उपाययोजना केली जाते. शाखाप्रमुख रात्री उशिरापर्यंत किंवा रविवारीही हजर राहून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेली रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय मदत याद्वारे हजारो लोक पक्षाशी जोडलेले राहतात.

शिवसेनेची ही ताकद लक्षात घेऊन भाजपचा विस्तार वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये या शाखांच्या धर्तीवर काम करणारी कार्यालये सुरू करण्यावर भाजपने भर दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये भाजपची ही कार्यालये सुरू होत आहेत. मात्र आम्ही शिवसेनेची ‘कॉपी’ करीत नसून जनसंपर्क वाढविण्यासाठी ती सुरू केली जात आहेत आणि बहुतांश कार्यालये निवडणुकीनंतरही सुरू ठेवली जाणार आहेत, असे वरिष्ठ भाजप नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

जनतेच्या अडचणी काय आहेत, त्या सोडविण्यासाठी या कार्यालयांमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहतील. केवळ निवडणुकीपुरताच जनतेशी संपर्क न साधता त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पक्ष कार्यकर्ते तयार असल्याचा संदेश त्याद्वारे जाईल, असा त्यामागे उद्देश आहे. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बूथ कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. दोन-अडीच वर्षांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

त्यामुळे त्यादृष्टीनेही आधीच तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यालयांची संख्या अधिकाधिक वाढविण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आमदार-खासदार, उमेदवारांची निवडणूक कार्यालये यांच्याव्यतिरिक्त ही कार्यालये जनसंपर्कासाठी सुरू राहणार आहेत.

भाजपला जर जनतेची सेवा करायची असेल, तर चांगली गोष्ट आहे. केवळ निवडणुकीसाठी स्टंटबाजी नको. पण भाजपने प्रत्येक प्रभागात कार्यालये उघडली, तरी त्याचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. या शाखांवर अडीअडचणींच्या वेळी नागरिक धावत येतात. पोलीस, न्यायालय, रुग्णालये अशा सर्व ठिकाणी शिवसैनिक अपरात्रीही धावपळ करून लोकांना मदत करीत असतात. त्यामुळे अडचणी सेनेकडूनच सुटतील, हा विश्वास आहे. हे काम भाजपला जमणार का?

अनिल परब, शिवसेना आमदार