राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी आज अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून यावेळी उमेदवारी न मिळालेल्या पक्ष कार्यकर्त्यांकडून मोठ्याप्रमाणावर बंडखोरी आणि नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. पुण्यातही भाजपच्या एका कार्यकर्त्याने पत्नीला उमेदवारी न दिल्याने पक्ष कार्यालयासमोर बसून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. गेल्या ४० वर्षांपासून जगन्नाथ कुलकर्णी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी यंदाच्या निवडणुकीत आपल्या पत्नीसाठी खुल्या वर्गाच्या प्रभाग क्रमांक १२ मधून उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाकडून त्यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जगन्नाथ कुलकर्णी यांनी संभाजी बाग येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. जगन्नाथ कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांची आई, पत्नी आणि मुले असे सर्व कुटुंबही उपोषणाला बसले आहे. जाणकारांच्या मते पुण्याच्या राजकारणात उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्याने उपोषणाला बसण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  काही दिवसांपूर्वी माझ्या पत्नीचे तिकीट निश्चित झाले होते. ते अचानकपणे कोणी कापले, हे मला माहित नाही. मागील ४० वर्षापासून पक्षाचे एकनिष्ठ म्हणून कार्यकर्ता काम केल्याचे फळ पक्षाने अशा प्रकारे दिले आहे.  त्यामुळे आपली मागणी मान्य केल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान, आता उपोषणाच्या ठिकाणी गर्दी जमली असून जगन्नाथ कुलकर्णी यांना पाठिंबा देण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या उपोषणात सहभागी झाल्या आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना पक्षांमधील अंतर्गत संघर्षही शिगेला पोहोचला आहे. ठाणे, नागपूरमध्ये भाजपमध्ये, नाशिकमध्ये शिवसेना तर अमरावतीमध्ये काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्याजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर मुंबईत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्याचे आणखी काही प्रकार समोर आले आहेत. कालच विद्यमान नगरसेवक नाना अंबोले आणि दिनेश पांचाळ यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या दादर आणि प्रभादेवीमध्येही बंडखोरी झाली आहे.  प्रभादेवीतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना तिकीट दिल्याने शिवसेनेचे नाराज महेश सावंत यांनी त्याविरोधात बंड पुकारले आहे. महेश सावंत हे प्रभादेवी वॉर्ड १९४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे प्रभादेवी विभागात शिवसेनेचाच अंतर्गत सामना रंगणार आहे. दादर, माहिम, प्रभादेवी हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात.