दोन वर्षांतच भाजपच्या १८ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, एका ज्येष्ठ मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, मुंबई महापालिकेतही लाच घेताना भाजपची महिला नगरसेविकाच पकडली गेली होती, आताही केवळ शिवसेनेचा पराभव करण्यासाठी जागोजागी गुंडांची भरती भाजपच करत आहे. उल्हासनगरमध्ये ओमी कलानीशी याच भाजपने ‘पारदर्शक’ युती केली. एवढेच नाही, तर कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत साडेसहा हजार कोटी रुपयांची घोषणा करून साडेसहा रुपयेही आजपर्यंत न देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेचा पराभव करण्यासाठी गुंडांची ‘कौरवसेना’ हेच भाजपवाले गोळा करत आहेत. मुंबै बँक घोटाळ्यात ज्यांच्या विरोधात विरोधी पक्षात असताना विनोद तावडे, एकनाथ खडसे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती, त्याच प्रवीण दरेकर यांना भाजपने सन्मानाने पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर आमदारही केले, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.

विटा विकून खाल्लेल्या पैशाचा हिशेब द्या!

पोलिसांना विधानसभेत मारणाऱ्या राम कदम यांना आमदारकी बहाल केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक गणंगांना भाजपच्या ‘गंगेत’ बुडवून पावन केले, हे सर्वसामान्य जनता पाहत आहे. नागपुरात तर मुख्यमंत्र्यांचे गुंड नगरसेवक धुमाकूळ घालत आहेत. भाजपचे आमदारपुत्र बारमध्ये मारामाऱ्या करताना पकडले गेले. नागपूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता असतानाही पालिकेत अनेक घोटाळे झाले त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल करून तेथील पालिकेच्या घोटाळ्याची हिम्मत असेल तर ‘पारदर्शी’ चौकशी करा, असे आव्हान अनिल परब यांनी दिले. धर्मयुद्ध करण्याची भाषा काल मुख्यमंत्र्यांनी केली खरी, परंतु राम मंदिराच्या नावावर विटा विकून खाल्लेल्या पैशाचा आधी हिशेब द्या, मगच धर्मयुद्धाची भाषा करा, असेही त्यांनी सुनावले.

गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत आमच्या सोबत असताना कधी भाजपच्या ‘शकुनी शेलारमामा’ला टक्केवारी दिसली नाही. कारण तेव्हा सुधार समितीत बसून हेच टक्केवारी मोजत होते. – अनिल परब, आमदार, शिवसेना