News Flash

मुख्यमंत्री सरकारचे स्थैर्य पणाला लावणार?

मतविभाजनाने विरोधकांनाही फायदा होण्याची भीती

‘एकला चलो रे’च्या भूमिकेने सरकारवर परिणाम शक्य; मतविभाजनाने विरोधकांनाही फायदा होण्याची भीती

नगरपालिका निवडणुकांपासून उधळलेला भाजपचा सत्तेचा वारू महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करण्यासाठी फुरफुरत आहे. मात्र मुंबई, ठाणे महापालिका प्रतिष्ठेच्या असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या कुबडय़ा फेकून देऊन विजयासाठी स्वतला पणाला लावणार की कच खाणार, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पक्ष संघटनेवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांचीच पकड असल्याचे दिसून येत असून ‘मिनी विधानसभा निवडणूक’ लढण्याची धुरा तेच वाहतील, असेच चित्र आहे.

भाजपच्या प्रदेश पदाधिकारी आणि कार्य समितीची बैठक शिवसेनेच्या ठाणे या बालेकिल्ल्यात गुरुवारी झाली. राज्यातील २५ जिल्हा परिषदा व १० महापालिकांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी आणि प्रचार मोहिमेला दिशा देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची होती. राज्यात सत्ता टिकविण्यासाठी फडणवीस यांना शिवसेनेच्या कुबडय़ा घ्याव्या लागलेल्या असल्या तरी विरोधी पक्षांपेक्षा अधिक त्रास देणाऱ्या शिवसेनेला भाजप वैतागलेला आहे. शिवसेनेला जागा दाखवून देण्यासाठी आणि निवडणूक लढविण्याची संधी अनेक वर्षे पक्षाचे काम करणाऱ्यांना देण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा दबाव आहे.

स्वतंत्र लढल्यास फायदा

स्वतंत्रपणे लढल्यास भाजपला विधानसभेप्रमाणेच कमीतकमी ७० व जास्तीत जास्त १०० पर्यंत जागा मिळतील, असे अंदाज पक्षाच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणात आले आहेत. भाजपला सुरुवातीला ५०च्या आसपासच जागा मिळतील, असा अंदाज होता. पण शिवस्मारकाचे भूमिपूजन आणि मुंबई-ठाण्यासाठी मेट्रो, म्हाडा, मोडकळीस आलेल्या इमारती व अन्य मुद्दय़ांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेले निर्णय हे पक्षाला मुंबईत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याइतके यश देतील, असे सर्वेक्षणातून पक्षाला आढळून येत आहे.

नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास दुणावल्याने आता पुढील निवडणुकांसाठी ‘चलाजिंकूया महाराष्ट्र सारा’ आणि ‘शत प्रतिशत भाजप’ अशा घोषणा समितीच्या व्यासपीठावरच लावण्यात आल्या होत्या. पक्षनेतृत्वानेच दिलेली ही दिशा पाहून शिवसेनेशी पटत नसल्याने राज्यभरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वाभाविकपणे शिवसेनेच्या कुबडय़ा फेकून देऊन ‘सत्तेत वाटेकरी नको’, असा नारा दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत पारदर्शी कारभाराबरोबरच आमच्या अटींवरच युती होईल, अशी आक्रमक भूमिका जाहीर केली

सरकारचे स्थैर्य महत्त्वाचे

‘मिनी विधानसभा निवडणूक’ असल्याने या निकालाचे पडसाद सरकारच्या स्थिरतेवरही पडणार आहेत, हे उघड आहे. मात्र त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस हे अधिक सावध असून स्वतला पणाला लावून शिवसेनेविरोधात लढण्याचा निर्णय घेण्यास कचरत आहेत. त्यांच्या ‘कृष्णनीती’च्या राजकीय खेळीचा तो एक भाग असला तरी आपली खुर्ची सांभाळण्यासाठी शिवसेनेला गोड बोलून खूश ठेवण्याकडे त्यांचा कल अधिक राहिलेला आहे. पक्षश्रेष्ठींना शिवसेनेला अद्दल घडवायची असली व शिवसेना संपवायची असली तरी ते अशक्य असल्याची जाणीव फडणवीस यांना आहे. त्यामुळे शिवसेनेविरोधात लढाई करण्याचे शड्डू ठोकूनही  ‘काँग्रेसमुक्त भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून काँग्रेसला फायदा होऊ नये, यासाठी शिवसेनेशी युतीची चर्चा करीत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ठाण्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद असून भाजपच्या जागा आधीपेक्षा थोडय़ा वाढतील. मुंबईत विधानसभेत शिवसेनेपेक्षा एक जागा अधिक पटकावल्याने स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, अशी आशा वाटत असली तरी पुढील काळात वातावरण बदलले आणि फटका बसला, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच येईल.

प्रचारात भाजप-शिवसेनेमध्येच रण पेटणार असून कटुता वाढणार आहे. पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर शिवसेना नेत्यांकडून टीका होईल, याची मुख्यमंत्र्यांना भीती आहे. बिघडलेल्या वातावरणात राज्यातील सरकारचे स्थैर्य टिकविणे मुख्यमंत्री फडणवीस यांना कठीण होईल. भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणालाही मोठे यश मिळाले, तर त्याचे पडसाद सरकारच्या स्थिरतेवर खचितच पडतील.  त्यामुळे शिवसेनेचे लांगूलचालन करीत युती करून मतभेदांची ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवायची की स्वतला पणाला लावून स्वबळावर लढायचे, हा निर्णय घेताना फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी लागणार आहे.

शिवसेनेचीही जोरदार तयारी

शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरू ठेवली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, पक्षपातळीवर अगदी विभागप्रमुखांच्याही बैठका घेऊन रणनीती आखली आहे. भाजपकडून सत्तेचा वापर करून प्रचंड ताकद लावली जाईल, हे गृहीत धरून शिवसेनाही प्रत्युत्तर देणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी चौखूर उधळलेला भाजपचा वारू यश मिळविणार की शिवसेना रोखणार, हे राज्यातील ‘मिनी विधानसभा निवडणुकीच्या’ सत्ता सारिपाटावर लवकरच ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:31 am

Web Title: bjp vs shiv sena in bmc elections
Next Stories
1 राज्यपाल विद्यासागर राव यांना दिल्लीचे वेध?
2 आंबेडकर पंजाबात भाजपच्या विरोधात, तर उत्तर प्रदेशात आठवलेंचे मायावती लक्ष्य
3 शिवसेनेची सावध खेळी
Just Now!
X