भाजप

दहा ते पंधरा जणांचा एक गट संगणकासमोर बसलेला.. सतत काही ना काही माहिती अद्ययावत होत आहे.. ती समाजमाध्यम अधिकृत पानांवर झकळवण्याची लगबग.. कोणी एका कोपऱ्यात बसून ग्राफीक तयार करीत आहे.. तर कुणी माहितीचा अभ्यास करत आहे.. कुणी टीव्हीवर लक्ष ठेवून आहेत.. पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मुंबई भाजपच्या कार्यालयातील समाजमाध्यम कक्षातील हे वातावरण एखाद्या युद्धतयारीहून वेगळे नव्हते.

समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात सध्या भाजप आघाडीवर आहे. समाजमाध्यमांच्या जन्मापूर्वी भाजपकडे ‘संवाद कक्ष’ कार्यरत होता. या कक्षामार्फत देशाच्या कानाकोपऱ्यात पक्षाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१३ मध्ये समाजमाध्यमाचा प्रभावी वापर सुरू केला आणि त्यांनी संवाद कक्षाचे रूपांतर समाजमाध्यम कक्षात केले. निवडणुकीच्या काळात या कक्षांना ‘वॉर रूम’चे स्वरूप येते.

प्रत्येक सेकंदाला येत असणाऱ्या माहितीवर नजर ठेवण्याचे काम या कक्षात युद्धपातळीवर सुरू असते. एखादा पक्ष उभारणीसाठी जसे तो पक्ष गल्लोगल्ली पोहोचला पाहिजे. यासाठी गल्लीत शाखा, मग शहर पातळीवर शाखा, मग तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर मग पुढे जिल्हा, राज्य व देश अशा पद्धतीने पक्षरचना असते. याच रचनेचा वापर भाजपच्या समाजमाध्यम कक्षाने केला आहे. त्यांनी मुंबई शहरातील प्रत्येक शाखेत इतकेच नव्हे तर राज्यातील प्रत्येक गावांतील प्रत्येक शाखेत एक समाजमाध्यम प्रतिनिधी नेमला आहे. हा प्रतिनिधी शहर पातळीवरील समाजमाध्यम प्रतिनिधीला त्याच्या विभागातील तपशील देतो. मग हा शहर पातळीवरचा प्रतिनिधी जिल्हा पातळीवर माहिती देतो मग ती तेथून मुख्य कार्यालयापर्यंत जाते. ही माहिती आल्यावर त्याचे महत्त्व लक्षात घेऊन ती समाजमाध्यमावर पाठविली जाते. या प्रतिनिधींना यासाठी खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे. सर्वाना उपयुक्त माहिती समाजमाध्यमांवर पोहोचविण्याची जबाबदारी मुख्य कक्षाकडेच असते. यामुळे या कक्षाकडून विविध सरकारी योजनांचा तपशील सांगणारे ग्राफिक्स तयार केले जातात व ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले जातात, अशी माहिती भाजपच्या मुंबई सोशल मीडिया कक्षाचे प्रमुख विद्युत काजी यांनी दिली. आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती समाजमाध्यमांवरून व्हायरल करण्यात आली आहे. फार शब्दबंबाळ न करता थेट ग्राफिकच्या माध्यमातून माहिती पोहोचविल्यामुळे ती लोकांना समजणे सोपे जाते असेही काजी यांनी नमूद केले. तसेच आवश्यकतेनुसार व्हिडीओज तयार करून तेही पोस्ट केले जातात. तसेच शहरात ठिकठिकाणी जे फलक लावले जातात त्या फलकांचे कामही या विभागाच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. ट्रोलिंगबाबत विचारले असता काजी म्हणाले की, या विभागात सक्षम अशी माणसे काम करत असून ते समाजमाध्यमांवर अरेला कारे करणारी उत्तरे देतात. मात्र आमचा भर हा सकारात्मक कामांना प्रसिद्ध देण्यावरच आहे. जे कोणी वैचारिक वाद घालतात त्यांना उत्तरे दिली जातात, पण त्यापेक्षा खालच्या दर्जाच्या ट्रोलिंगकडे आम्ही सपशेल दुर्लक्ष करत असल्याचेही ते म्हणाले.

प्रत्येक वॉर्डात व्हॉट्सअ‍ॅप समूह

यंदा प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील इमारतींमध्ये फिरून एका कुटुंबातील एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक मिळवला जाणार आहे. हे क्रमांक मिळाल्यावर त्याचे व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करून विभागतील माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाणार असल्याचेही काजी यांनी नमूद केले. यामुळे हा यंदाचा वेगळा प्रयोग ठरणार आहे. हे सर्व करत असताना पालिका निवडणुका डोळ्यासमोर असल्या तरी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचा पाया भक्कम करण्याचे हे काम असल्याचेही काजी म्हणाले.