… आणि मुंबई महापालिकेच्या इतिहासातला तो सोन्याचा दिवस उजाडला. पारदर्शक कारभाराचा पहिला दिवस! एवढ्या वर्षांच्या जुलमी राजवटीनंतर पहिल्यांदा महापालिकेच्या इमारतींनी मोकळा, पारदर्शक श्वास घेतला होता. आजपासून सगळा कारभार पारदर्शक होणार होता. साक्षात महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलं होतं. आणि फडणवीसांचं आश्वासन, म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ! ती कधीच पुसली जाणार नाही, अस्पष्ट होणार नाही. हां, आता पारदर्शक कारभारामुळे दगडाचाच रंग बदलून तो फिकट किंवा पांढरा झाला, तर गोष्ट वेगळी.

तर, महापालिकेच्या ऐतिहासिक कालखंडाच्या पहिल्याच दिवशी सगळे कर्मचारी, नगरसेवक, आयुक्त, महापौर महापालिकेच्या इमारतीत आले, तेव्हा त्यांना सगळीकडे काचाच काचा दिसल्या. पायाखाली काचा, छपराला काचा, भिंतीला काचा, खिडकीला काचा! काचा असल्यामुळे कारभार पारदर्शक होणारच. सगळं आरपार दिसणार. सगळ्या काचांच्या कोपऱ्यात सीसीटीव्ही. प्रत्येक घटनेचं, प्रत्येक हालचालीचं, प्रत्येक संभाषणाचं लाइव्ह रेकॉर्डिंग होणार आणि ते गल्लोगल्ली, नाकोनाकी, चौकोचौकी, स्टेशनोस्टेशनी, उपनगरोउपनगरी दिसणार. कुठलाही छुपा कारभार नाही. कुठलीही लबाडी नाही. भ्रष्टाचार नाही, गैरव्यवहार नाही, लांड्यालबाड्या नाहीत. काळा पैसा नाही. प्रत्येक कंत्राट, प्रत्येक व्यवहार, प्रत्येक योजना पारदर्शक. त्यासाठीचा कागदसुद्धा पारदर्शक वापरायचा निर्धार होता, पण मग तो आदेशच दिसणार नाही, असा एक मुद्दा समोर आल्यामुळे तो निर्णय रद्द झाला.

स्थायी समितीची सभासुद्धा शिवाजी पार्कवर होणार. कुठलाही टेबलाखालचा व्यवहार नाही. कंत्राटदारांना सवलती नाहीत, पक्षपात नाही. ज्याला कुणाला कंत्राट घ्यायचं, त्यानं सरळ बोली लावायची, हजारो लोकांसमोर टेंडर उघडली जाणार, त्यातलं सर्वोत्तम टेंडर जनता ठरवणार आणि त्या व्यक्तीला काम मिळणार. नगरसेवक, महापालिका कर्मचारी, यांचं पर्सेंटेज वगैरे काही भानगडच नाही. नगरसेवकांनी निवडणुकीत खर्च केलेला पैसा दर महिन्याला मिळणाऱ्या मानधनातून वसूल करावा. त्यासाठी आपल्या सोयीच्या माणसांची वर्णी लावणं, त्यांच्याकडून भागीदारी, टक्केवारी मिळवणं, ही भानगडच नाही.

महापालिकेच्या इमारतीला अनेक वर्षांनी हायसं वाटलं. एवढा पारदर्शकपणा तिनंही कधी पाहिला नव्हता. मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. उलट खेळपट्ट्या उखडणाऱ्यांवर आता सत्तेतल्या भाजपला बदनाम करण्यासाठी ठरवून रस्ते उखडण्याची वेळ! एकही अनधिकृत बांधकाम नाही, एकही अनधिकृत व्यवसाय नाही. रस्ते मोकळे, चकाचक. लोकलच्या गर्दीला शिस्त, मेट्रोला शिस्त, पोलिसांना शिस्त, वाहनांना शिस्त. कचरा करणाऱ्यांना शिस्त, कचरा उचलणाऱ्यांना शिस्त. कुठेही कचरा नाही, अस्वस्छता नाही.
जनता प्रचंड खूश. असा स्वप्नातला दिवस कधीच उगवणार नाही, याची जनतेला आधीच खात्री. हा त्यांचा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यदिन. आपलं मत वाया गेलं नाही, आपली फसवणूक झाली नाही, याचा जनतेला प्रचंड अभिमान.
पारदर्शकतेचा उदोउदो. देवेंद्र फडणवीसांचा गौरव. भाजपचा प्रचंड सन्मान.

एवढ्यात एका नतद्रष्ट, भाजपद्वेष्ट्याचा प्रश्न – पारदर्शक कारभारच करायचा, तर महापालिकेपर्यंत वाट का बघितली? आधी केंद्रात आणि नंतर राज्यात सत्ता मिळाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत तिथूनच सुरुवात करता आली नसती का..?

– अभिजित पेंढारकर