News Flash

पालिकेच्या पारदर्शकतेला केंद्राची पावती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार पुरते तोंडघशी पडले आहेत.

Brihanmumbai Municipal Corporation : मुंबईतील १ कोटी २० लाख लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक करदात्याचे ५१,२५० रूपये बँकेत फ्रिज झाले आहेत. त्यामुळेच भाजपला पारदर्शी कारभार हवाय, असे शेलार यांनी म्हटले आहे.
  • आर्थिक पाहणी अहवालात कारभाराचे कौतुक
  • भाजपच्या प्रचारातील हवा गुल

‘पारदर्शक कारभारा’च्या मुद्दय़ावर अडून बसत शिवसेनेची कोंडी करू पाहणाऱ्या भाजपला त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे दणका बसला आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिका ही देशातील सर्वात पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकसहभाग असलेली महापालिका म्हणून कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे पारदर्शकतेचा मुद्दा मांडून सेनेच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार पुरते तोंडघशी पडले आहेत.

शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्यापूर्वी ‘पारदर्शक’तेचा मुद्दा मान्य करा, असा आग्रह धरत भाजपने युतीचे बारा वाजविण्याचा विडा उचलला होता. ‘आता केंद्र शासनाने देशातील सर्व महापालिकांमध्ये मुंबई महापालिकेचा कारभार सर्वात पारदर्शक असल्याचे तसेच कार्यक्षम व सेवेत उत्तम असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातच नमूद केल्यामुळे

भाजपचे ‘पारदर्शक’ मुख्यमंत्री, शकुनी शेलारमामा आणि पालिकेचे वस्त्रहरण करू पाहणारा दु:शासनरूपी किरीट सोमय्यांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही,’ असा टोला शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी लगावला. गंभीर बाब म्हणजे पारदर्शकतेच्या मुद्दय़ावर शेवटच्या सहा महापालिकांमध्ये भाजपच्या ताब्यातील दिल्ली महापालिका, सुरत महापालिका, अहमदाबाद महापालिका, जयपूर महापालिका, डेहराडून आणि चंदिगड महापालिकेचा समावेश असल्याचेही अनिल देसाई यांनी सांगितले. आर्थिक पाहणी अहवालात पान क्रमांक ३०७ वर आलेखासह ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. पारदर्शक कारभारात मुंबईबरोबर हैदराबाद पालिकेचाही प्रथम क्रमांक असून भांडवली कामांसाठीच्या खर्चातही मुंबई महापालिका ही प्रथम क्रमांकावर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

प्रामुख्याने गेल्या वर्षभरात विकास नियंत्रण नियमावली, इमारत प्रस्ताव आराखडय़ांना मंजुरी देण्याची प्रक्रिया, दुकाने व आस्थापना यांना परवानग्या देण्याची प्रक्रिया, हॉटेल व रेस्टॉरंट यांची परवानगी व तपासणीसह अनेक गोष्टींमध्ये आयुक्त अजोय मेहता यांनी केवळ पारदर्शकताच नव्हे, तर गतिमानताही आणली. पालिकेच्या वेबसाइटवर अशा प्रकारची सर्व माहिती लोकांसाठी खुली केल्यामुळे तसेच कालबद्ध वेळेत परवानगी देणे अधिकाऱ्यांना बंधनकारक केल्यामुळे मुंबई महापालिका देशात अव्वल ठरल्याचे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी तत्काळ आज पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांचे अभिनंदन केले असून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह पालिकेतील एकही नेता पारदर्शकतेसाठी आयुक्तांचे अभिनंदन करण्यासाठी का गेला नाही, असा सवाल सेना नेत्यांनी उपस्थित केला.

मुंबई महापालिकेचा कारभार गतिमान, लोकाभिमुख केल्यामुळेच हे यश मिळाले. सर्व माहिती पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिल्यामुळे आणि अधिकाऱ्यांना आवश्यक परवानग्या निश्चित मुदतीत देणे बंधनकारक केल्यामुळ अंतर्गत उत्पन्नही वाढण्यास मदत झाली.

अजोय मेहता, महापालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 2:38 am

Web Title: bmc administration is most transparent says economic survey of central government
Next Stories
1 उमेदवारी मिळाल्यास विभागप्रमुखांना पदावरून हटवणार
2 मुंबई वेगळी करण्याचा डाव असेल तर पाय छाटेन; राज ठाकरेंचा इशारा
3 मुंबई वेगळी करण्याचा डाव असेल तर पाय छाटेन; राज ठाकरेंचा इशारा
Just Now!
X