24 November 2017

News Flash

BMC election 2017: ‘कपबशी’ने वाढवली रिपाइं-भारिपची डोकेदुखी

प्रचार करताना कार्यकर्त्यांना अडचणी

प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 21, 2017 5:19 PM

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु असतानाच, दोन्ही पक्षांना मिळालेल्या ‘कपबशी’ या चिन्हामुळे डोकेदुखी वाढली आहे. कपबशी हे चिन्ह दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाले आहेच, शिवाय इतर अपक्ष उमेदवारांनाही हेच चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे प्रचार करताना अडचण येत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- रिपाइं (आठवले गट) युती झाली असून, रिपाइंने १९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युती असली तरी रिपाइंचे उमेदवार भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका आठवले यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे कपबशी व नारळ हे चिन्ह मिळाले आहे. तसेच भारिपनेही ४९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या दोन्ही पक्षांच्या अनेक उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. कपबशी चिन्हामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ उडत आहे. तसेच इतर अपक्ष उमेदवारांनाही कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे भारिप-रिपाइंच्या कार्यकर्त्यांची प्रचार करताना दमछाक होत आहे. या दोन्ही गटांत दलित मते विभागली जाणार आहेत. काही ठिकाणी दोन्ही गटांतील रिंगणात असलेल्या उमेदवारांना मतदार फारसे ओळखत नसल्याने कपबशी चिन्हाचा प्रचार करताना कार्यकर्त्यांना गटातल्या नेत्यांचा आणि उमेदवाराचा प्रचार करताना फलक, उपरण्यावरील फोटोकडे मतदारांचे लक्ष वेधून प्रचार करावा लागतो, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान काही ठिकाणी रिपाइं व भारिप या दोन्ही गटांचे उमेदवार एकमेकांसमोर रिंगणात आहेत. शिवाय सर्वच वॉर्डांत बसपनेही उमेदवार उभे केले आहेत. त्यांचे चिन्ह वेगवेगऴे असले तरी दलित मतांची विभागणी होणार आहे, असे मानले जाते.

रिपाइं हा नोंदणीकृत पक्ष आहे. आमच्या पक्षाच्या उमेदवारांना कपबशी आणि नारळ चिन्ह मिळाले आहे. ज्या ठिकाणी इतर पक्षांतील उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले आहे, तेथे आमचा उमेदवार नाही. त्यामुळे चिन्हामुळे प्रचार करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत, असे रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले आहे. भारिपच्या ४९ उमेदवारांपैकी ४२ उमेदवारांना कपबशी आणि उर्वरित उमेदवारांना मेणबत्ती हे चिन्ह मिळाले आहे. इतर अपक्षांनाही कपबशी चिन्ह मिळाले आहे. कार्यकर्त्यांचा गोंधळ उडू नये यासाठी प्रचार करताना उमेदवारांचा आणि आमच्या नेत्यांचे फोटो असलेले फलक, उपरणांचा वापर केला जात असल्याने अडचण येत नाही, असे भारिपचे प्रवक्ता महेश भारतीय यांनी सांगितले.

First Published on February 17, 2017 2:18 pm

Web Title: bmc election 2017 bharipa bahujan mahasangh rpi headaches election symbol