मुंबई, ठाण्यात निवडणूक रिंगणातील १५४ जणांवर खून, खंडणीचे गंभीर गुन्हे

राजकारणाच्या वाढत्या गुन्हेगारीकरणाबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना आणि सारेच राजकीय पक्ष गुन्हेगारीचा निपात करू, असे तारस्वरात आश्वासन देत असताना मुंबई व ठाण्यात जवळपास सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी गुन्हेगारांना लक्षणीय प्रमाणात उमेदवारी दिल्याचे दिसत आहे. या उमेदवारांवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, मुंबई व ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात फार तफावत नसल्याचे आढळले आहे.

‘एडीआर- महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ या नामांकित संस्थेने मुंबई व ठाण्यातील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून ही सारी माहिती जमा केली आहे. मुंबईतील राजकीय पक्षांच्या  १६४१ उमेदवारांपैकी १५४ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच अभ्यास केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या तुलनेत हे प्रमाण नऊ टक्के आहे. शिवसेनेच्या १७३ उमेदवारांपैकी २८, म्हणजेच १६ टक्के उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या १५१ पैकी १४, म्हणजेच नऊ टक्के उमेदवारांचा अशा यादीत समावेश आहे. काँग्रेस १६ उमेदवार (नऊ टक्के), मनसे  २२ उमेदवार (१४ टक्के), राष्ट्रवादी  १६ उमेदवार (१२ टक्के), तर, एमआयएमच्या चार टक्के उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यातून स्पष्ट होते. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, फसवणूक या गुन्ह्य़ांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांमध्ये समावेश होतो.

ठाण्यात मनसे आघाडीवर

ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ९६ उमेदवारांपैकी १४ टक्के, तर भाजपच्या ९२ पैकी १३ टक्के उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मनसेच्या ९६ पैकी २० टक्के, राष्ट्रवादीच्या ७१ पैकी १७ टक्के, काँग्रेसच्या ४३ पैकी नऊ टक्के, एमआयएमच्या १८ पैकी १७ टक्के उमेदवारांच्या विरोधात अशा गुन्ह्य़ांची नोंद आहे.

गंभीर गुन्हे कोणते?

खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, फसवणूक या गुन्ह्य़ांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांमध्ये समावेश होतो. असे गुन्हे दाखल असलेले १५४ उमेदवार आहेत.

मुंबईत ३० टक्के उमेदवार करोडपती

मुंबई महापालिकेच्या रिंगणातील १६४१ उमेदवारांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा आढावा या संस्थेने घेतला. यापैकी ४८९ उमेदवार करोडपती असल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या दहा करोडपतींच्या यादीत भाजपचे तीन, काँग्रेसचे तीन, तर शिवसेनेच्या चार उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत भाजपचे उमेदवार पराग किशोर शाह आघाडीवर असून त्यांनी स्थावर आणि जंगम अशी एकूण मिळून ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपयांची मालमत्ता असल्याचे उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केली आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे विनायक नाना पाटील (५६ कोटी), शिवसेनेच्या जयश्री अनिल मिस्त्री (४४ कोटी), शिवसेनेच्या दीपा गणेश पाटील (४३ कोटी), काँग्रेसचे टय़ुलीप ब्रायन मिरांडा (४२ कोटी), शिवसेनेचे राजेश नंदकुमार कदम (४१ कोटी), काँग्रेसचे राजेंद्र चिंतामण साळवी (३५ कोटी), भाजपचे विद्यार्थी सिंग (३५ कोटी), भाजपचे हरिष राजीव छेडा (३२ कोटी), आणि शिवसेनेच्या स्वाती सुनील शितप (२६ कोटी) यांचा क्रमांक लागतो.

ठाण्यात केणी दांपत्य श्रीमंत

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत कळव्यातील राष्ट्रवादीचे प्रभाग क्र. २३चे उमेदवार मुकुंद केणी यांची मालमत्ता ६६ कोटी, तर त्यांच्या पत्नी, उमेदवार प्रमिला यांची मालमत्ता ६७ कोटींची आहे. रमाकांत पाटील (भाजप) – ५२ कोटी, सुलोचना पाटील (राष्ट्रवादी) – ४२ कोटी तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पत्नी परिशा सरनाईक यांची मालमत्ता ३८ कोटींची आहे.