News Flash

BMC Election 2017: भाजप-मित्रपक्षांतील जागावाटपाचा तिढा सुटला; रिपब्लिकनला २५ जागा

शिवसंग्रामला चार, रासपला पाच जागा

मुंबई महानगरपालिका

मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2017) भाजप आणि मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. भाजप १९५ जागांवर लढणार असून मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषदेत दिली.

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. येईल त्याला सोबत घेऊ, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आणि शिवसंग्रामच्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. मात्र, मुंबईत शिवसेना-भाजपची युती अखेर तुटली आणि भाजपने मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू होती. मित्रपक्षांनी वाढीव जागा मागितल्याने तिढा निर्माण झाला होता. तो अखेर सुटला आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्ष एकत्र आले आहेत. भाजपने मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडल्या आहेत. तर भाजप १९५ जागांवर निवडणुका लढणार आहे. मित्रपक्षांतील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला २५, राष्ट्रीय समाज पक्षाला पाच आणि शिवसंग्रामला चार जागा सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान भाजपने काल, गुरुवारीच १९२ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे उर्वरित जागांवर मित्रपक्षांची बोळवण करण्याचे आव्हान भाजपसमोर होते. ते आव्हान आता यशस्वी पार पाडले आहे. जागावाटपाचा तिढा सुटल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप नक्कीच क्रमांक एकचा पक्ष असेल. मुंबईचे महापौरपद भाजपचा असेल. भाजप आणि मित्रपक्षांची मुंबई महापालिकेत सत्ता आली तर रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद देणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाला ४०-४५ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. पण आमच्या पक्षासाठी भाजपने २५ जागा सोडल्या आहेत. ते आम्ही मान्य केले आहे. मुंबईच्या विकासासाठी महायुतीचा महापौर करून तर बघा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, शिवसंग्रामसाठी भाजपने चार जागा सोडल्या आहेत. त्यावर समाधानी आहोत, पण संतुष्ट नाही, अशी प्रतिक्रिया शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 3:39 pm

Web Title: bmc election 2017 bjp rpi rsp shivsangram all fight together against shivsena
Next Stories
1 महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारांमध्ये ‘दंगल’
2 Municipal Corporation LIVE : शिवसैनिकांचा विरोध डावलून स्नेहल आंबेकरांना वॉर्ड क्र. १९८ मधून उमेदवारी
3 महिलाराज!; मुंबई महापौरपद खुला प्रवर्गासाठी, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे महिलांसाठी राखीव
Just Now!
X