मुंबई महापालिकेच्या २१ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीसाठी एकूण २२७५ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी पालिका क्षेत्रात १ हजार ५८२ ठिकाणी सुमारे ७ हजार ३०४ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून सोमवारी या प्रक्रियेसाठी ४२ हजार ७९७ कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणच्या मध्यवर्ती मतदान केंद्रांवर (सीपीएस) मतदानविषयक प्रशिक्षण देण्यात आले.  यावेळी एकूण मतदार ९१ लाख ८० हजार २९१ असून, त्यापैकी पुरुष ५० लाख ३० हजार १६१ आणि महिला मतदार, ४१ लाख ४९ हजार ७४९ आहेत. शिवाय ३८१ तृतीयपंथीदेखील निवडणुकीत उतरले आहेत. या निवडणुकीसाठी अंदाजे ९५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

पालिकेच्या २४ प्रशासकीय वॉर्डात २३ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले असून, प्रत्येक निवडणूक अधिका-यांकडे सरासरी ८ ते १३ निवडणूक प्रभागांची जबाबदारी आहे. चार दिवसांपूर्वीच मतदान पेट्या केंद्रीय मतदान केंद्रांवर (सीपीसी) पोहचल्या असून, त्या सीलबंद झाल्या आहेत. सोमवारी कुलाबापासून ते मुलुंड-दहिसरपर्यंत नियुक्त केलेल्या विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचारी तसेच पालिकेच्या आणि खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी सकाळी १० पासून मतदान प्रशिक्षण आयोजिण्यात आले होते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन (इव्हीएम) कसे वापरावे, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया कशी बिनचूक पार पाडावी, मतदारांना कसे मार्गदर्शन करावे, मतदानाच्यावेळी काही अडचण आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत तात्काळ माहिती द्यावी आदी बाबीसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

यंदा मतदान केंद्रांवर प्रत्येक उमेदवाराची संपत्ती आणि त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्यास ती माहितीपण प्रदर्शित करण्यात येणार आहे, याविषयी मतदान केंद्राध्यक्ष आणि सहाय्यक मतदान केंद्रध्यक्षांना यावेळी अवगत करण्यात आले.  मतदानाची प्रक्रिया २१ फेब्रुवारीला सकाळी ७.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ५.३० वाजता संपेल. त्यानंतर कोणालाही मतदान करता येणार नाही, असे देशमुख म्हणाले. निवडणूक निर्णय अधिकारी निहाय २३ केंद्रावर मतमोजणीची प्रक्रिया २३ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे.

अपंगांसाठी रॅम्प व डोलीची व्यवस्था

अपंगांसाठी रॅम्प व डोलीची व्यवस्था, पहिल्या मजल्यावर एक हजार ६५ ठिकाणी मतदान केंद्र यावेळी अपंग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था केली आहे. जेथे मतदान केंद्रे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहेत. तेथे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग मतदारांसाठी डोलीची खास व्यवस्था केली असून, पहिल्या मजल्यावर १ हजार ६५ ठिकाणी तर दुस-या मजल्यावर मतदान केंद्रे असलेली ५४ ठिकाणे आहेत.

वॉर्ड क्र १६४ मध्ये सर्वाधिक उमेदवार

पालिकेच्या वॉर्ड क्र १६४ मध्ये सर्वाधिक ३१ उमेदवार रिंगणात आहेत. येथे सर्वाधिक उमेदवार असल्याने या ठिकाणी ३ बॅलेट युनिट लावण्यात येणार आहे. तसेच ३७ ठिकाणी १५ पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे तेथेही दोन बॅलेट युनिट असणार आहेत.

पक्षनिहाय उमेदवार संख्या

शिवसेना : २२७, भाजप : २११, मनसे : २०१, काँग्रेस : २२१, राष्ट्रवादी काँग्रेस : १७१, बीएसपी : १०९, एमआयएम : ५६, कम्युनिस्ट पक्ष (आय) : १०, कम्युनिस्ट पक्ष (एम) : ११, एस.पी. : ७६, जे. डी. एस : १०, एल पी : १, ए आय एम डी के : ३, अपक्ष : ७१७, अन्य मान्यता पक्ष : २५१.