शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार ‘नोटीस पिरियड’वर असल्याचे सांगून कोणत्याही क्षणी शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडेल, असे संकेत दिल्यानंतर काँग्रेसने शिवसेनेला जाहीर आव्हान दिले आहे. मुंबई महापालिकेतील घोटाळ्यावरून मुंबईकरांचे लक्ष विचलित व्हावे, यासाठीच शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही पक्षांची मिलीभगत आहे. तसे नसेल तर मग शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा राज्यातील इतर महापालिकांपेक्षा अधिक आहे. तरीही मुंबईचा विकास झालेला नाही. मुंबई महापालिकेने कोणत्याच नवीन योजना राबवल्या नाहीत. या शहरात मेट्रो, मोनो रेल्वे सेवा, मुक्त मार्ग, सी-लिंक आदी कामे काँग्रेस सरकारच्या काळात झाली आहेत, असे मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईत सर्वत्र लागलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच मुंबईचे महापौर होणार आहेत काय, असे वाटू लागले आहे, असा सणसणीत टोला तिवारी यांनी लगावला. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपकडे चेहरा नाही. ज्या राज्यांत फिरत आहे, तेथील भाजपच्या जाहिरातींवर मोदींचाच चेहरा झळकताना दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी मोदींवर केली. निवडणुका आल्या की भाजपला राम मंदिर आठवतो. नोटाबंदीनंतर निवडणूक असलेल्या राज्यांत भाजपकडून भरपूर पैसा पुरवला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी नोटाबंदीवरून तिवारी यांनी रिझर्व्ह बँकेवरही तोफ डागली. आपली स्वायत्तता रिझर्व्ह बँकेने गमावली आहे. हे लोकशाहीला घातक आहे, याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले.

मुंबईतील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात दरवर्षी ९ हजार कोटींची तरतूद केली जाते. तरीही येथील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. प्रतिकिलोमीटरला साडेचार कोटींचा घोटाळा होत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी केला. मुंबई महापालिकेचे साडेसात वर्षे ऑडिट झाले नाही. त्यामुळे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराला शिवसेना-भाजप हे दोघेही जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही शिवसेना आणि भाजपसह मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. शिवसेना हप्तेखोर आहे. मग देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत, असा सवाल निरुपम यांनी केला.