देवेंद्र फडणवीस हे लवकरच माजी मुख्यमंत्री होतील, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. ते गुरूवारी अमरावतीमध्ये बोलत होते. भाजपकडून काल महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या काळात ‘सामना’ वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या मागणीचा संजय राऊत यांनी आजच्या सभेत समाचार घेतला. ‘सामना’वर बंदी म्हणजे आगीशी खेळ असल्याचे राऊत यांनी म्हटले.

भाजपशी युती तोडल्यानंतर शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून सातत्याने सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले जात आहेत. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत असून उद्धव ठाकरेंचा आदेश येता क्षणी आम्ही मंत्रिपदाचा त्याग करु, अशी वक्तव्ये सातत्याने शिवसेनेचे नेते करत आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यातील सरकार नोटीस पिरियडवर असल्याचे सांगत भाजपला इशारा दिला होता. त्यानंतर भाजपनेही शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास  सरकार वाचविण्यासाठी पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. फडणवीसांच्या या विधानामागे काही राजकीय आडाखे असल्याची चर्चा आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल किंवा नाही, याबाबत दोन शक्यता गृहीत धरण्यात येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला ८० च्या वर जागा मिळतील, असा त्या पक्षातील नेत्यांचा अंदाज आहे. शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले तर, सत्ता स्थापनेसाठी भाजपला त्याच पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. किंवा शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तरी, त्यांनाही सत्तेचे गणित जमविण्यासाठी भाजपचाच पाठिंबा घ्यावा लागणार आहे. महापालिकेच्या सत्तेत एकत्र आल्यानंतर, राज्यातील सत्तेतून शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता नाही. राजकीय जाणकारांच्या मते कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू स्थिती असेल, परिणामी पालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी भाजप व सेनेला सबुरीने घ्यावे लागेल, त्यामुळे राज्यातील सरकार अबाधित राहील, असा त्यांचा होरा आहे.