मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असून आज महापौरपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे. भाजपकडून प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे आणि शैलजा गिरकर यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही महापौरपदासाठी अर्ज भरला जाणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला आहे. २२७ सदस्य असलेल्या महापालिकेसाठी सत्तास्थापनेसाठी ११४ ची मॅजिक फिगर गाठणे महत्त्वाचे आहे. शिवसेनेने ८४ नगरसेवक आणि शिवसेनेला पाठिंबा देणा-या ४ अपक्ष नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. तर भाजपनेही शुक्रवारी कोकणभवन येथे अधिकृत नोंदणी केली आहे. शनिवारी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवसेनेकडून वांद्रे पूर्वमधील नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाडेश्वर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शुक्रवारी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ८४ वर पोहोचले आहे. भाजपच्या ८२ नगरसेवकांमध्ये २३ गुजराती व ११ उत्तर भारतीय असले तरी भाजपकडून मराठी चेहराच महापौरपदासाठी दिला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. मनसे आणि एमआयएमच्या पाठिंब्यावर महापौरपदावर विराजमान होण्याचे भाजपचे स्वप्न आहे अशी चर्चाही रंगली आहे. सर्व पर्याय खुले असले तरी मराठी माणसालाच पाठिंबा असेल असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केल्याने या चर्चेला पाठबळ मिळाले आहे.

दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीकडून शुक्रवारी संध्याकाळी उशिरा विठ्ठल लोकरे यांचे नाव महापौरपदाच्या उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले. मानखूर्दमधून काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या लोकरे यांना राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. ८ मार्च रोजी मुंबईचा महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल.

LIVE UPDATES:

१३:२८: हेमांगी वरळीकर शिवसेनेच्या उप महापौरपदाच्या उमेदवार.

१२:५२: महापौरपदासाठी समाजवादी पक्षही अर्ज भरणार, सूत्रांची माहिती

१२:४५: महापौरपदासाठी शिवसेनेचा उमेदवार निश्चित. विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौरपदाची उमेदवारी – टीव्ही वृत्त

१२:०९: महापौरपदासाठी भाजपकडून दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल होणार.