राजू शेट्टी यांचा आरोप; शेतकरी कर्जमाफी व शेतीमालाला योग्य दर यासाठी आंदोलन

आमच्या मदतीने सत्तेवर आल्यावर भाजपचा मित्रांना संपविण्याचा प्रयत्न असला तरी माझा संघर्ष कधीही संपणार नाही, असे प्रतिपादन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफी व शेतीमालाला योग्य दर मिळावा, यासाठी निवडणुकीनंतर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर सरकारमधून बाहेर पडायचे, स्वबळावर लढायचे की शिवसेनेबरोबर जायचे, याचा निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले. मात्र शेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ तयार झाल्याशिवसाय त्यांच्या मागण्यांना मूर्त स्वरुप येत नाही व संघटनेची ताकद वाढत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

भांडवलशाही शक्तींकडून शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांची संघटना संपविण्याचेही प्रयत्न झाले व आंदोलनाची ताकद कमी करण्यात आली. त्याच पध्दतीने भाजपने मित्रपक्षांना संपविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पण गोरगरीब शेतकरी ही आमची ताकद असून ते प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. ते एका विचाराने आमच्या बरोबर आहेत. ते संघटनेपासून दूर जाणार नाहीत, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढत होतो. त्यावेळी आमच्याबरोबर येऊन त्याचा राजकीय फायदा भाजपने घेतला. मात्र सत्तेवर आल्यावर आता त्यांची वागणूक बदललेली आहे. मुख्यमंत्र्यांपासून सर्व नेत्यांचा अहंकार वाढला आहे. भाजपमधील निष्ठावंताना जिथे विचारले जात नाही, तिथे ते मित्रपक्षांना काय किंमत देणार, हा प्रश्न आहे.

तूरडाळीचा पेरा वाढला असताना आयातही करण्यात आली, साखरेवरचे आयातशुल्क कमी करण्यात आले. कांद्याची फारशी निर्यात होत नसल्याने दर पडले आहेत व शेतकऱ्यांना तो जाळून टाकावा लागत आहे. केंद्र सरकारची धोरणे चुकीची आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सत्तेत गेल्याने संघटनेची ताकद कमी झाली आहे का, असे विचारता सत्तेत गेल्याने ती वाढलेली नाही व कमीही झाली नाही. आम्ही जेथे होतो, तिथेच आहोत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी मतभेद नसून संघटनेच्या पुढील वाटचालीचा निर्णय सर्वाशी चर्चा करुनच घेतला जाईल, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

सदाभाऊ खोत भाजपच्या व्यासपीठावर

सांगली: स्वाभिमानीतील उच्चपदस्थ दोन नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या विसंवादाच्या पाश्र्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजप प्रचाराच्या व्यासपीठावर हजेरी लावून भाजपचे निशाण असलेली कमळाची पट्टीही गळ्यात अडकवली. मात्र याबाबत विचारणा होणार हे लक्षात येताच माध्यमांशी बोलणे टाळले.