गतवेळच्या तुलनेत यंदा उच्चशिक्षितांच्या संख्येत वाढ

‘सुशिक्षित लोकप्रतिनिधी हवा’ यावरून सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून नेहमीच ओरड केली जाते. त्या टीकेच्या भीतीने का होईना, यंदा सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेकडेही लक्ष दिल्याने यंदा नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये उच्चशिक्षितांचा टक्का वधारल्याचे दिसून येत आहे. गतवेळच्या तुलनेत यंदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या पदवीधर नगरसेवकांची संख्या सुमारे २८ने वाढली आहे. पदवीधर आणि पदव्युत्तर नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने साहजिकच दहावीपेक्षा कमी शिक्षण असलेल्या नगरसेवकांची कमी झाली आहे.

महापालिकेत गेल्या वेळेसही दहावी, बारावी, नववीपर्यंत शिकलेले यापेक्षा पदवीधरांची संख्या अधिकच होती. मात्र यंदा त्यात २८ पदवीधर नगरसेवकांची भर पडली आहे. २०१२ मध्ये महापालिकेवर निवडून आलेले ५० नगरसेवक दहावीपेक्षा कमी शिक्षण असलेले होते. परंतु आता निवडून आलेल्यांपैकी केवळ ३८ नगरसेवक दहावीपेक्षा कमी शिक्षण असलेले आहेत. तर दहावी उत्तीर्ण असलेले नगरसेवक २०१२ मध्ये ५३ होते. आताही दहावी उत्तीर्णाची संख्या ५३च आहे. तर बारावी उत्तीर्ण ३८ आहेत. गेल्या खेपेत ही संख्या अधिक म्हणजे ५४ होती. बारावी उत्तीर्णाची संख्या या वेळेस कमी असली तरी पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची वाढली आहे. गेल्या वेळेस केवळ ६७ नगरसेवक पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले होते. यंदा ही संख्या वाढून ९५वर गेली आहे.

पक्षनिहाय म्हटले तर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी साधारणपणे सारख्याच संख्येने पदवीधर आणि पदव्युत्तर नगरसेवक निवडून दिले आहेत. तर काँग्रेसकडे सात नगरसेवक पदवीधर आहेत. भाजपच्या तिकिटावरून निवडून आलेले नील सोमय्या यांच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे. तर मालाडहून सहा वेळा निवडून आलेले राम बारोट डॉक्टर आहेत. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये काही जण व्यवसायाने वकीलही आहेत. शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांना हरवून अँटॉप हिल येथून काँग्रेसच्या तिकीटवर निवडून आलेले ‘जायंट किलर’ सूफियान वणू (वय ३३) एमबीए आहेत.

नगरसेवकांचे शिक्षण

२०१२

* दहावीखाली – ५०

* दहावी उत्तीर्ण – ५३

* बारावी उत्तीर्ण – ५४

* पदवीधर-पदविका – ६७

(तीन जागा रिक्त)

२०१७

* दहावीखाली – ३८

* दहावी उत्तीर्ण – ५३

* बारावी उत्तीर्ण – ३८

* पदवीधर-पदव्युत्तर – ९५