महापौरपदासाठी उमेदवार; भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी-सपसह आघाडीची रणनिती

मुंबई महापौरपदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असून, पक्ष तटस्थ राहणार नाही. भाजपला रोखण्याकरिता शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्याचे काँग्रेसचे धोरण आहे.

महापालिकेत काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले असून, ही मते महापौरपदाच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा किंवा मतदान केले जाणार नाही हे काँग्रेसने आधीच जाहीर केले आहे. शिवसेना आणि भाजपपासून समान अंतर राखण्यात येईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी यांनी जाहीर केले आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये भाजप हा क्रमांक १ चा शत्रू आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने शिवसेनेला मदत होईल, अशी काँग्रेसची खेळी असेल. काँग्रेसमुक्त भारत असे ध्येय असलेल्या भाजपचा पाडाव करणे हे ध्येय असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळातून सांगण्यात येते.

काँग्रेसच्या वतीने शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी जाहीर केले. कोणाचा अर्ज भरायचा याचा निर्णय उद्या रात्री जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी अशी निधर्मवादी पक्षांची आघाडी करण्याची योजना आहे. या संदर्भात राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीशी चर्चा झाल्याचेही निरुपम यांनी सांगितले. काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतल्यास टीका होऊ शकते. यामुळेच उमेदवार उभा करून काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाची ४६ मते फुकट घालवायची योजना आहे. यातून शिवसेनेचा लाभ होऊ शकतो. कारण शिवसेनेला ८९ सदस्यांचा पाठिंबा आहे. मनसेने आपले पत्ते खुले केलेले नसले तरी ही मते भाजपला मिळणार नाहीत, अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा सुरू करून भाजपने संभ्रमाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला असला तरी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

भाजपची उद्या बैठक

भाजपच्या नेत्यांची उद्या बैठक होत असून, त्यात रणनीती आखली जाईल. भाजपच्या हालचालींकडे शिवसेनेचे बारीक लक्ष आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव शनिवारी सकाळी जाहीर करण्यात येईल.