दादर परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १९४मधील शिवसेनेतील बंडखोर नेते महेश सावंत यांच्या गाडीची काल रात्री अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना ही घटना घडल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाले आहे. महेश सावंत यांनी काल रात्री प्रभादेवी परिसरातील त्यांच्या कार्यालयाबाहेर गाडी उभी केली होती. त्यानंतर रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वॉर्ड क्रमांक १९४ मधून शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवरणकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने महेश सावंत नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सेनेविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले होते. महापालिकेची यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असून यंदा दादर-वरळी भागात मुसंडी मारण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक निवडून आल्यानंतर सेनेचे नाक कापले गेले होते. मात्र, यावेळी परिस्थिती बदलल्यामुळे बालेकिल्ल्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकून भाजपवर वरचष्मा राखण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भागात एकही जागा गमवणे शिवसेनेला परवडणारे नाही. मात्र, याच भागात पक्षातील अनेकांनी बंडखोरी केली असून सेनेच्या अधिकृत उमेदवारांनाच आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज भरल्यानंतर शिवसेनेने या बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्नही केले होते. खासदार राहुल शेवाळे यांनी या बंडखोरांशी बोलणी केली होती. यावेळी महेश सावंत यांना विभागप्रमुखपदाची ऑफर देण्यात आल्याचीही चर्चा होती. मात्र, तरीही सावंत यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या सामना चौकातील सभेनंतर समाधान सरवणकर ‘फेव्हरिट’ मानला जात आहेत. एकेकाळी सरवणकर यांचे निकटवर्तीय असलेल्या सावंत यांना कितपत सहानुभूती मिळते, यावर या प्रभागातील निकाल अवलंबून आहे. दुसरीकडे संतोष धुरी यांनी मतदारांच्या थेट भेटीला जात त्यांच्याशी संवाद साधण्याचा मार्ग अवलंबला आहे. धुरी यांनी नगरसेवक असताना केलेल्या कामांचा लेखाजोगा ते मांडत आहेत. त्यामुळे काही भागांमधून शंभर टक्के त्यांना मिळणारी मते शिवसेनेसाठी धोकादायक ठरू शकतील.