मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा कालावधी संपल्यावरही प्रसारमाध्यमांवर मुलाखतींचा धडाका लावला असून या मुलाखती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून कारवाई झाली नाही तर थेट न्यायालयीन कारवाईचा विचार करु असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली असून प्रचार संपल्यावर या मुलाखती दाखवल्या जात आहेत. शिवसेनेने यावर आक्षेप घेतला आहे. सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती दिली. छातीवर कमळाचे चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मुलाखतींचा धडाका लावला असून हा सरकारी अधिकारांचा गैरवापर असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. प्रचाराची वेळ संपल्यावर प्रचार करु नये असा नियम आहे. मात्र वेळ संपल्यावरही मुख्यमंत्र्यांनी मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखती म्हणजे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची दिवसभर सुरु असलेली मुलाखत हा पेड न्यूजचा प्रकार असावा असा संशयही शिवसेनेने व्यक्त केला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र आयोगाने कारवाई न केल्यास आम्हाला न्यायालयीन कारवाईचा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला. जर मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळत असेल तर ती सर्वांना मिळायला हवी अशी मागणीही शिवसेनेने केली.

सरकारी यंत्रणा वापरुन मुख्यमंत्री विरोधकांना धमकावतात. पारदर्शकतेच्या गप्पा मारणा-यांना राजकारणातील ही पारदर्शकता दिसत नाही का ? असा प्रश्नही शिवसेनेने उपस्थित केला. भाजपच्या नेत्यांना मतांसाठी बाळासाहेबांचे नाव घ्यावे लागले. बाळासाहेबांमुळेच भाजप मोठी झाली अशी आठवणही शिवसेनेने करुन दिली. उद्धव ठाकरेंच्या चौकशीचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावरही शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखलेले नाही असे सांगत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले.

आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमारेषेवरील जवानांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. परिचारक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाईची घोषणा केली असती तर आम्हाला आनंद वाटला असता असे राऊत यांनी म्हटले आहे. परिचारक हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत.