News Flash

BMC election 2017: शिवसेनेत बंडाळी; भाजपमध्ये घराणेशाहीमुळे धुसफूस

सोमय्या, पुरोहित, ठाकूर यांच्या घरात उमेदवारी

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

मुंबई महापालिका निवडणुकीचे रण तापले असतानाच शिवसेनेत बंडाळी माजली असून, भाजपमध्ये घराणेशाहीमुळे धुसफूस असल्याचे चित्र आहे. शिवसेना आणि भाजपची उमेदवार यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या दोन्ही पक्षांतील बंडखोरी आणि नाराजीला उधाण आले आहे. शिवसेनेतील तीन मातब्बर नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. तर वडाळा येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आल्याचे पाहावयास मिळते. भाजपच्या यादीत मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने भाजपच्या इच्छुकांमध्ये धुसफूस वाढली आहे.

पक्षातील बंडखोरीचा धोका लक्षात घेऊन शिवसेना आणि भाजपने उमेदवारी यादीबाबत कमालीची गुप्तता राखली होती. शिवसेनेने बुधवारी रात्रीच ए बी फॉर्मचे वाटप केले होते. मात्र दोन्ही पक्षांच्या याद्या सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन्ही पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकानी इतर पक्षांची वाट धरण्यास सुरुवात केली आहे. त्यात शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक नाना अंबोले, दिनेश पांचाळ, प्रभाकर शिंदे या तिघांचा समावेश आहे. वॉर्ड क्रमांक १९८ मधून नाना अंबोले यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली. मात्र त्यांना देण्यात आली नाही. वॉर्ड क्रमांक १४४ मधून दिनेश पांचाळ यांनी उमेदवारी मागितली होती; मात्र तेथून खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुलुंडमधील शिवसेनेचे नेते, माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनाही उमेदवारी नाकारली. त्यामुळे या तिघांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. तसेच वडाळा वॉर्ड क्रमांक १७८ मधून युवा सेनेचे अमेय घोले यांना उमेदवारी निश्चित झाल्याने त्याविरोधात स्थानिक शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या वॉर्डातून माधुरी मांजरेकर या इच्छुक आहेत. वॉर्ड क्रमांक १९९ मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. या वॉर्डातून शिवसेना नेते राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपाली कुसळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी धरला होता.

भाजपमध्ये घराणेशाही

भाजपमध्ये नेत्यांच्या मुलांना, विद्यमान नगरसेवक आणि नातेवाईकांना तिकीटे दिल्याने इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे. व्हायरल झालेल्या पहिल्या यादीत खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक १०८, आमदार राज पुरोहित यांचा मुलगा अवकाश पुरोहित यांना प्रभाग क्रमांक २२१, राज्यमंत्री विद्या ठाकुर यांचा मुलगा दीपक ठाकूर यांना गोरेगावातील वॉर्ड क्रमांक ५० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनेच तिकीट वाटपात घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पक्षात इच्छुकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्या पत्नी रुक्मिणी खरटमोल यांना प्रभाग क्रमांक १४८ मधून उमेदवारी दिली आहे. तसेच भाजप प्रवक्ते अतुल शाह यांना प्रभाग क्रमांक २२० मधून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपकडून विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी

अलका केरकर – माजी उपमहापौर – ( प्रभाग क्रमांक ९८)

राजश्री शिरवाडकर (प्रभाग क्रमांक १७२)

भाजप गटनेते मनोज कोटक (प्रभाग क्रमांक १०३)

सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे (प्रभाग क्रमांक १०४)

विनोद शेलार ( प्रभाग क्रमांक ५१)

उज्ज्वला मोडक ( प्रभाग क्रमांक ७४)

आयारामांना उमेदवारी

मंगेश सांगळे ( प्रभाग क्रमांक ११८ )

मकरंद नार्वेकर (प्रभाग क्रमांक २२७)

हर्षीदा नार्वेकर ( प्रभाग क्रमांक 226 )

सुखदा पवार (प्रभाग क्रमांक ९३)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 8:44 pm

Web Title: bmc election 2017 shivsena and bjp face trolls party activist
Next Stories
1 ‘कुरुप’ मुलींना हुंडा द्यावा लागतो, १२ वीच्या पुस्तकातील विधानामुळे वाद
2 लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्यासाठी ‘जागल्या’ व्हा!; सामाजिक संस्थांचे मतदारांना आवाहन
3 मुंबईची ५ स्थानके कात टाकणार!
Just Now!
X