भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेनी मुंबई महानगर पालिकेमध्ये एकत्र यावे आणि अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी दिला आहे. दोन्ही पक्षांची युती लोकसभेसाठी आहे, विधानसभेसाठी आहे तेव्हा दोघांनी महानगरपालिकेसाठी एकत्र यावे असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये जागांचा फरक काही मोठा नाही तेव्हा दोन्ही पक्षांनी एकत्र येणे योग्य राहील असे त्यांनी म्हटले. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न होईल असे देखील ते म्हणाले. शिवसेनेचे जास्त नगरसेवक आहे तेव्हा त्यांनी आधी महापौरपद घ्यावे नंतर भाजपने घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेनी एकत्र यावे असे म्हटले होते.

त्यांच्या या विधानाला शिवसेनेनी प्रत्युत्तर दिले आहे. हे शहाणपण आधी का सुचले नाही असे उत्तर शिवसेनान नेते अनिल परब यांनी दिले होते.  याआधी, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे, असे ते म्हटले. शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन अडीच – अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे. दोन्ही पक्षांची युती व्हावी, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. युती व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे रामदास आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. शिवसेनेने इतर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेण्यापेक्षा भाजपसोबत युती करावी, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून युतीबाबतचा प्रस्ताव आल्यास मी नक्की विचार करेन, असेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना -भाजप एकत्र आल्यास मोठी ताकद निर्माण होईल. मागील विधानसभा निवडणुकीत दोन्हीही पक्ष वेगवेगळे लढले होते. मात्र, त्यानंतरही दोन्ही पक्ष एकत्र आले होते आणि राज्यात सत्ता स्थापन केली होती, असे सांगून मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.