सभेच्या जागेवरून गोंधळ; जागेसाठी आडकाठी आणल्याचा  सेनेचा भाजपवर आरोप

ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असतानाच भाजप, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीपाठोपाठ आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी जाहीर सभा ठाण्यात होणार आहे. या सभेकडे सर्वाचे लक्ष लागले असतानाच सभेच्या जागेवरून मात्र सकाळपासून शहरात गोंधळाचे वातावरण होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्घेश्वर तलाव परिसरात ही सभा घेण्याचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता. मात्र वाहतूक कोंडीच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिवसेना नेत्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. तसेच या सभेकरिता जागा मिळू नये म्हणून भाजप आडकाठी आणत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत होता. अखेर तलावपाळी परिसरातील रस्त्याची एक बाजू सभेकरिता देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी शुक्रवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. मनोरुग्णालयाजवळील मैदानात ही सभा घेण्यासंबंधी शिवसेना नेते विचार करीत होते. शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवसेनेच्या उमेदवारांपुढे भाजपने दिलेले आव्हान लक्षात घेऊन शिवसेना नेत्यांनी नौपाडय़ातील विष्णूनगर भागात सभा घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलिसांनीही परवानगी देऊ केली. असे असतानाच  शिवसेनेने सिद्घेश्वर तलाव परिसरातील रस्त्यावर जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, या सभेमुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ शकेल, असे कारण पुढे करत पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नेत्यांनी सिद्धेश्वर तलाव परिसरातील रस्त्याची पोलिसांसोबत पाहाणी केली. त्यानंतरही पोलीस परवानगी देण्यास नकार दिला. त्यावरून शिवसेना नेते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज ठाण्यात

एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यात शुक्रवारी जाहीर सभा रंगणार असतानाच दुसरीकडे मात्र त्याच दिवशी शहरात रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांचा रोड शो आणि किसननगर भागात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे शहरात एकाच दिवशी या दोन्ही नेत्यांच्या सभा रंगणार आहेत.