शिवसेना महाराष्ट्रात कुणाशीही युती करणार नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात भाजपशी काडीमोड घेतल्याचे जाहीर केले. ते गुरूवारी मुंबईतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. शिवसैनिकांनी मला वज्रमुठ द्यावी, दात मी पाडून दाखवतो. तुमची साथ असल्यास भविष्यात शिवसेना महाराष्ट्रावर एकट्याने भगवा फडकवेल. या सत्तेमध्ये कोणीही वाटेकरी नसेल, ही सत्ता एकट्या शिवसेनेचीच असेल, असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांवरून भाजपला फैलावर घेतले. देशाचे पंतप्रधानपद तुमच्याकडे आहे, राज्याचे मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे आहे, मंत्रिमडळातील चांगली खाती तुमच्याकडे आहेत, त्यावर आम्ही काही बोललो नाही. मात्र, शिवसेनेला कोणी कमी लेखत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्याला मी जागेवर शिल्लक ठेवणार नाही. जेव्हा कोणाचीही हवा नव्हती तेव्हा शिवसेनेच्या कामांनी तुम्हाला वाचवले. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेत जागावाटपाच्या वाटाघाटी करताना तुम्ही शिवसेनेकडे ११४ जागा मागता, हा शिवसेनेचा अपमान नाही का, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. शिवेसेनेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा विचार करता, भाजपसोबतच्या युतीत सेनेची २५ वर्षे सडली. मात्र, तेव्हा आम्ही देशासाठी आणि हिंदुत्त्वासाठी तुमचा उदोउदो करत बसलो. एवढेच काय हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून अमराठी लोकवस्ती असलेले  विभाग तुमच्यासाठी सोडले, याची आठवण उद्धव यांनी भाजपला करुन दिली. मात्र, आता नव्या वर्षात मी तुमच्यासमोर शिवसेनेच्या नव्या वाटचालीची दिशा स्पष्ट करत आहे. यापुढे शिवसेना महाराष्ट्रात एकटी भगवा फडकवेल. महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता भविष्यात कुठेही युती करणार नाही. आता यापुढे लढाई सुरू झालेली आहे. मला आता एकच ध्यास आहे, ही संधी आहे, करीन तर आत्ताच आणि ते मी केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

[jwplayer kdACyjdG]

महाराष्ट्रात सरकारचा उधळलेला बैल रोखा, रस्त्यावर उतरून लढा, असे सांगत उद्धव ठाकरेंनी सुरूवातीपासूनच भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुंबई महानगरपालिकेत पारदर्शक कारभाराची भाषा करणाऱ्यांनी केंद्रात आणि राज्यातही पारदर्शक कारभार करावा. पालिकेत स्थायी समितीचे सदस्य आणि आयुक्तांच्या उपस्थितीत निर्णय घेतले जातात. त्याप्रमाणेच पारदर्शी कारभारासाठी कॅबिनेटच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि लोकायुक्तांनाही सहभागी करून घ्या, असे उद्धव यांनी म्हटले. याशिवाय, उद्धव यांनी मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांमधून देवदेवतांच्या तसबिरी, प्रतिमा बाहेर काढाव्यात, सत्यनारायण पूजा व अन्य कार्यक्रम करू नयेत, या राज्य सरकारच्या फतव्यावरही आसूड ओढले. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा. अन्यथा या निर्णयाची चुरळी करू, असे उद्धव यांनी भाषणादरम्यान ठणकावून सांगितले.