शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाजपशी असलेला २५ वर्षांचा घरोबा संपुष्टात आणल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर काहीचवेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई परिवर्तन होणारच, असे सांगत शिवसेनेचे आर या पारच्या लढाईचे आव्हान स्विकारल्याचे संकेत दिले. सत्ता हे साध्य नाही तर विकासाचे साधन आहे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. त्यामुळे जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. मुंबईत परिवर्तन होणारच, असे सांगत फडणवीसांनी भाजपही स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर सातत्याने टीका करून शिवसैनिकांसाठी व्हिलन ठरलेल्या आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आम्ही मुंबई महानगरपालिकेत केवळ पारदर्शकतेची मागणी केली. त्याचा इतर कुणाला त्रास होत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. मात्र, आगामी निवडणुकीत पालिकेची सत्ता मिळवून आम्ही मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली पारदर्शी कारभार करून दाखवू, मुंबई खड्डेमुक्त करू, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजप येत्या २८ तारखेला आपली भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितले.

त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने शेवटच्या क्षणी युती तोडून शिवसेनेला चांगलाच धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले होते. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप सातत्याने एकमेकांविरुद्ध कुरघोडी करत होते. दोन्ही पक्षांकडून अनेकदा एकमेकांना युती तोडण्याचेही इशारे देण्यात आले होते. परंतु, या इशाऱ्यांचे रूपांत निर्णयात झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून नवे हेवेदावे सुरू झाले होते. भाजपने शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांपैकी निम्म्या जागांची मागणी केली होती. मात्र, उद्धव यांनी आज ही मागणी जाहीरपणे धुडकावून लावत राज्यातील आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता भविष्यात कुठेही युती करणार नाही. आता यापुढे लढाई सुरू झालेली आहे. मला आता एकच ध्यास आहे, ही संधी आहे, करीन तर आत्ताच आणि ते मी केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.