03 March 2021

News Flash

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड

शिवसेनेत ३८ वर्षांपासून कार्यरत

मुंबई महापालिकेमध्ये यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत माझगावमधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या यशवंत जाधव यांची पालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड़ करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. मुंबईच्या विकासासाठी शिवसेनेचे नगरसेवक कटिबद्ध राहणार आहेत. सभागृहात शिवसेनेची भूमिका खंबीरपणे मांडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उपनेते नगरसेवक यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड केली आहे, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

यशवंत जाधव हे गेल्या ३८ वर्षांपासून शिवसेनेत आहेत. महापालिका निवडणुकीत माझगावमधून ते तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. १९९७ मध्ये जाधव हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदा ते वॉर्ड क्रमांक २०९ मधून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत सात वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद तसेच स्थापत्य समिती शहर, प्रभाग समिती अध्यक्षपद तसेच बाजार व उद्यान समिती अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले असून, पालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनेही ८२ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. दोन अपक्षांनी शिवसेनेला समर्थन दिले आहे. तसेच इतर अपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. आता शिवसेनेचा महापौर झाल्यास कुणाला खुर्ची मिळणार याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. त्यात यशवंत जाधव यांचेही नाव आघाडीवर होते. याशिवाय मिलिंद वैद्य आणि मंगेश सातमकर यांचीही नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येते. मिलिंद सातमकर यांनी याआधी महापौरपद भूषवले आहे. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. तर ज्येष्ठ नगरसेवक राजुल पटेल, किशोरी पेडणेकर, विश्वनाथ महाडेश्वर यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, आता यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड झाल्याने ते या शर्यतीतून बाद झाल्याचे मानले जाते. महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसल्यास आता यशवंत जाधव यांना सभागृह नेतेपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:46 pm

Web Title: bmc election 2017 yashwant jadhav elected shivsena group leader mumbai
Next Stories
1 महापौरपदावरून संघर्ष करण्याबाबत भाजपमध्ये मतभेद
2 भाजपला दीड कोटींपेक्षा जास्त मते !
3 रिपब्लिकन पक्षाची २५ वर्षांची परंपरा खंडित
Just Now!
X