उत्तर पश्चिम मुंबई

भाजपबरोबर युती केल्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचा खासदार निवडून आला. विधानसभा निवडणुकीत युती नसताना सेना-भाजपला अनुक्रमे तीन आमदार निवडून आणता आले. भाजप उमेदवारांच्या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कामी आला अशी चर्चा झाली. त्यामुळे पालिका निवडणुकीतील भाजपच्या यशाकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र या परीक्षेत भाजपचे तिन्ही आमदार उत्तीर्ण झाले असे नव्हे तर सेनेच्या उर्वरित तीन आमदारांनाही आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे.

४३ प्रभागांपैकी २२ प्रभाग खिशात टाकून भाजपने खासदारकीचा मार्गही मोकळा केला आहे. सेनेला फक्त १३ प्रभाग जिंकता आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीला अनुक्रमे चार व दोन जागांवर समाधान मानता आले. दोन अपक्षही जिंकून आले आहेत. मनसेचे अस्तित्त्वच पार पुसले गेले. विद्यमान उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा पराभव भाजपच्या विद्या ठाकूर यांनी केला तेव्हाच गोरेगाव या शिवसेनेच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला होता. आठपैकी पाच नगरसेवक निवडून आणून श्रीमती ठाकूर यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी सातपैकी चार नगरसेवक निवडून आणून आपला विजय केवळ मोदी करिश्म्यामुळे नसल्याचे सिद्ध केले आहे. विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवार अपात्र ठरल्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉ. भारती लव्हेकर निवडून आल्याचा दावाही वर्सोवा मतदारसंघात फोल ठरला आहे. सेनेचे दिग्गज नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश फणसे यांना तर काँग्रेसमधून सेनेत आलेले माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांना भाजपच्या नवख्या उमेदवारांनी धूळ चारली.

जोगेश्वरी पूर्वेत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर वगळता सेनेच्या उर्वरित दोन आमदारांचे पानिपत झाले आहे.  अंधेरी पूर्वेत सेनेच्या रमेश लटके यांना सातपैकी फक्त एक प्रभाग राखता आला आहे तर सुनील प्रभू यांच्या दिंडोशी मतदारसंघातही भाजपने पाच जागा जिंकून सेनेला फक्त तीन जागांवर समाधान मानायला लावले आहे. अपक्ष उमेदवार चंगेश मुलतानी यांनी सेनेचे विद्यमान नगरसेवक राजू पेडणेकर यांना पाणी पाजले आहे.

पक्षनिहाय नगरसेवक

शिवसेना : प्रवीण शिंदे, रचना सावंत, अनंत नर, आत्माराम चाचे, विनया सावंत, सुहास वाडकर, स्वप्नील टेंबवलकर, रेखा रामवंशी, साधना माने, प्रतिमा खोपडे, राजूल पटेल, शाहिदा खान, प्रियांका सावंत.

भाजप : प्रीती सातम, पंकज यादव, दक्षा पटेल, प्रतिभा शिंदे, विनोद मिश्रा, संगीता शर्मा, दीपक ठाकूर, हर्ष पटेल, राजुल देसाई, श्रीकला पिल्ले, संदीप पटेल, रंजना पाटील, रोहन राठोड, योगीराज दाभाडकर, सुधा सिंग, रेणु हंसराज, सुनीता मेहता, अनीश मकवाना, केसरबेन पटेल, सुनील यादव, मुरजी पटेल, अभिजित सामंत.

काँग्रेस :अल्पा जाधल, मेहेर हैदर, विन्नी डिसुझा, सुषमा राय.

राष्ट्रवादी काँग्रेस : सोफी जब्बार, धनश्री भरडकर.

अपक्ष :  चंगेश मुलतानी, तुळशीराम शिंदे.