भाजपच्या दादर कार्यालयापुढे फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर

मुंबईत मतमोजणीला सुरुवात झाल्यावर दीड-दोन तास शिवसेनेने चांगली आघाडी घेतल्याचे आणि कल भाजपच्या विरोधात असल्याचे दिसत होते. मात्र हळूहळू शिवसेनेच्या आघाडीला ब्रेक लागू लागला आणि भाजपची सरशी होऊ लागली. ‘भाजपची ‘औकात’ तर ४० जागांची आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदारपणे ६० जागा दिल्या’ असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे ४० जागांचा टप्पा पार करेपर्यंत दादर कार्यालयात वाढलेला ताण हा टप्पा पार केल्यानंतर मात्र दूर झाला. त्यानंतर भाजप कार्यालयापुढे फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली, ती उत्तरोत्तर वाढतच गेली. कार्यकर्ते विजयोत्सवाचा मनमुराद आनंद लुटण्यात मग्न झाले.

मतमोजणीनंतर शिवसेनेने आघाडी घेतल्याचे चित्र दिसू लागल्यावर भाजपच्या गोटात अस्वस्थता व चिंतेचे वातावरण होते. भाजपच्या दादर येथील कार्यालयातील सभागृहात मोठय़ा पडद्यावर निकाल पाहण्याची सोय करण्यात आली होती. तिथे आणि कार्यालयाबाहेर अनेक कार्यकर्ते निकाल पाहत होते. मतमोजणी सुरू होऊन दीड-दोन तास उलटल्यावर भाजपने ४० जागांचा टप्पा ओलांडला आणि भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. या दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या राजीनाम्याचे वृत्त धडकले व लगेच मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या राजीनाम्याचीही अफवा पसरली. शेलार हे दादर कार्यालयातच बसून निकालाची माहिती घेत होते. त्यांना राजीनाम्याबाबत विचारता ‘मी मजा घेत आहे’ असे त्यांनी सांगितले.

भाजपने ७५ व ८० जागांचा टप्पा ओलांडल्यावर जोरदार जल्लोष झाला. राज्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुंबई कार्यालयात दाखल झाले. आशीष शेलार, खासदार किरीट सोमय्या तेथे होतेच. मुख्यमंत्री येताच जोरदार आतषबाजी व जल्लोष सुरू झाला व तो टिपेला पोचला.

शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

भाजपने ४० जागांचा टप्पा पार केल्यानंतर काही वेळातच शिवसेनेचे कार्यकर्ते तेथे आले व घोषणाबाजी करू लागले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. भाजपचे मुंबई उपाध्यक्ष विनायक कामत व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. ‘शिवसेनेचे कार्यकर्ते जर आम्हाला डिवचत असतील, तर आम्हीही शिवसेनाभवनपुढे जाऊन घोषणाबाजी करू’ असे आव्हान भाजप कार्यकर्त्यांनी दिले. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दूर केले आणि शिवसेना कार्यकर्त्यांना पिटाळले.