उमेदवार निवडून येण्याच्या प्राधान्यक्रमात शिवसेनेने सर्वात अखेरच्या क्रमांकावर ठेवलेल्या मुस्लीमबहुल बेहरामपाडय़ात अनपेक्षित विजय मिळवला. काँग्रेस, सपा आणि नवख्या एमआयएमचे आव्हान मोडून काढत बेहरामपाडय़ात हिरव्या रंगाच्या जोडीला भगवा फडकला. एमआयएममधून सेनेत आलेल्या उमेदवारामुळे या भागात धनुष्यबाणाची हवा असल्याची बातमी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिली होती.

सहा मजली झोपडय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या वांद्रे पूर्वच्या मुस्लीमबहुल बेहरामपाडय़ात कायमच काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत येथे एमआयएमने १५ हजार मते खिशात घालून खळबळ उडवली होती. शिवसेनेने एमआयएमकडून आयात केलेल्या उमेदवाराला पालिका निवडणुकांसाठी तिकीट देऊन या विभागात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. सेनेच्या या खेळीला प्रतिसाद मिळाला. या भागात फेरफटका मारल्यावर ‘भाजप नको म्हणून सेनेला मतदान करत असल्याचे’ अनेकांनी सांगितले होते. मात्र खुद्द सेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या मनात या विभागाबद्दल शंका होती.

आधीच्या वांद्रे टर्मिनस आणि निर्मल नगर या प्रभागांत डॉ. प्रियतमा सावंत व खेरवाडी, बेहरामपाडा या दुसऱ्या प्रभागात गुलिस्ता शेख नगरसेवक होत्या. या दोन्ही प्रभागांमध्ये वांद्रे स्थानकालगतच्या झोपडपट्टीखेरीज मध्यमवर्गीय वस्तीही होती. त्यामुळे मुस्लीमेतर मतांचाही प्रभाव पडत होता. मात्र नव्या प्रभागरचनेत वांद्रे टर्मिनस, बेहरामपाडा, गरीब नगर, वांद्रे कोर्ट असा सर्व परिसर एकाच ९६ क्रमांकाच्या प्रभागात आला. प्रभागाच्या पुनर्रचनेनंतर हा प्रभाग ८० टक्क्यांहून अधिक मुस्लीमवस्तीचा प्रभाग बनल्याने अखेरच्या दिवसांत धार्मिक भावनांना खतपाणी घातल्यास ही जागा हातून जाईल, असे मत सेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आले होते.

एमआयएमकडून तिकीट मिळाले नसल्याने हाजी हलीम खान यांनी सेनेतून तिकीट मिळवले होते. एमआयएमसोबत काम केल्याने त्यांना लोक ओळखत होते, त्याचा सेनेला फायदा झाला, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.