पाच वर्षांपूर्वी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धडक देत मनसेने शिवसेनेला चारीमुंडय़ा चित केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्याचे शल्य बोलून दाखवले होते. जखम मोठी होती. मराठी माणसाने शिवसेनेऐनजी मनसेच्या राजाला साथ दिली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेनेने लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करत महापालिका निवडणुकीत आपला बालेकिल्ला पुन्हा हस्तगत केला.

मनसेची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत मनसेला पालिकेत सात जागा मिळाल्या तर २०१२ च्या पालिका निवडणुकीत मनसेने २८ जागा िंजंकताना दादरमधील सातही जागा जिंकून दादरचा सेनेच्या बालेकिल्ल्यावर मनसेचा झेंडा फडकावला होता. त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही मनसेचे नितीन सरदेसाई दादरमधून विजयी झाले होते तर मनोहर जोशींच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवालाही मनसे कारणीभूत झाले होते. दरम्याच्या काळात शिवसेनेने पद्धतशीरपणे कामाला लागून लोकसभेत विजय मिळवला. पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीन सरदेसाई यांचा पराभव करून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी झाले. राहिला प्रश्न महापालिकेच्या नव्याने दादरमध्ये झालेल्या सहा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा. लोकसभा व विधानसभेतील निकालानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सावध होऊन पक्षबांधणी करतील, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देत स्वत: सक्रिय होती. तथापि नाशिकवर प्रेम

असलेल्या राज ठाकरे यांनी तेथे लक्ष कें द्रित करताना पक्षबांधणीसह मुंबईत विशेष लक्ष दिले नाही. परिणामी मनसे मुंबईसह राज्यात कमकुमवत होत गेली. पक्षनेतृत्वाला आपल्यासाठी वेळ नसल्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारी वाढू लागल्या व मोठय़ा संख्येने मनसेचे नगरसेवक, माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनी मनसेला राम राम ठाकला. ही पडझड थांबविण्यासाठी राज ठाकरे अथवा त्यांच्या शिलेदारांनी काहीही केले तर नाहीच उलट दोन लोक उरले तरी मी दोन लाख करीन ही भाषा राज यांची होती. स्थापनेनंतर राज यांनी केलेल्या घणाघाती भाषणांमुळे एक अपेक्षा निर्माण होऊन लोकांनी मनसेला मोठय़ा प्रमाणात साथ दिली. त्या तुलनेत मवाळ असलेल्या व सौम्य भाषण करणाऱ्या उद्धव यांना लोकांनी त्यावेळी नाकारले होते. तथापि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानानंतर विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका लोकांना भवली होती. दादरची जखम शिवसेनेसाठी मोठी होती. त्यामुळे मतदारसंघाची बांधणी  मजबूत करण्यावर उद्धव यांनी भर दिला तर मनसे या काळात संपूर्ण गाफिल राहिली. मतदारांना गृहित धरून मनसेचे पदाधिकारी वावरत होते. त्याचाच फटका दादरच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेला यावेळी बसला. मनसेच्या एका नगरसेविकेला लाच घेताना पकडण्यात आले तर सात नगरसेवकांपैकी संदीप देशपांडे व संतोष धुरी वगळता फारसा प्रभाव कोणी पाडला नव्हता. परिणामी संदीप देशपांडे यांचा मतदारसंघ महिला झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला तेथून उमेदवारी दिली तर शिवसेनेने माजी महापौर विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली. याशिवाय विरेंद्र तांडेल व सुधीर जाधव यांचेही मतदारसंघ महिला झाल्यामुळे त्यांच्या पत्नींना मनसेतर्फे उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेने माहीममधून माजी महापौर मिलिंद वैद्य यांना तर संतोष धुरी यांच्या विरोधात आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांची कन्या शितल देसाई यांनी भाजपमधून मिळवलेला विजय वगळता पाचही जागा शिवसेनेने पुन्हा हस्तगत करून बाळासाहेबांचे बालेकिल्ला जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले.