News Flash

मुंबईत एकच तर अन्यत्र चार मते देणे बंधनकारक!

महानगरपालिकांसाठी मतदान कसे करायचे?

दहा महानगरपालिकांसाठी येत्या मंगळवारी मतदान होत आहे. मुंबईत एकसदस्यीय प्रभाग पद्धत असून, अन्य नऊ महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये एकसदस्यीय गट किंवा गण आाहेत.

महानगरपालिकांसाठी मतदान कसे करायचे?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांना एकच मत देण्याचे अधिकार आहेत. मुंबईत एकसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने एकच मत देता येईल. ठाणे, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, नाशिक, सोलापूर, अकोला आणि अमरावती या नऊ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय म्हणजे चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आल्याने मतदारांना चार मते देण्याचे बंधनकारक आहे.

चार जागांसाठी मतदान कसे करायचे?

– चार जागांसाठी अ, ब, क, ड अशी विभागणी करण्यात आली आहे. उदा. प्रभाग क्र. १ (अ), (ब), (क), (ड). मतदान यंत्रांवर या चार जागांसाठी वेगळी रचना करण्यात आली आहे. उमेदवारांची संख्या मर्यादित असल्यास दोनच यंत्रांवर चारही जागांवरील उमेदवार मावू शकतात. उमेदवारांची संख्या जास्त असल्यास तीन किंवा चार यंत्रे वापरली जातील. प्रत्येक जागेवर मतदान करणे आवश्यक आहे. म्हणजे चारपैकी दोनच मते देऊ, असा विचार मनात आल्यास ते मत बाद ठरू शकते. कारण मतदारांनी चार बटणे दाबल्याशिवाय मतदान केल्याचा बिप आवाज येणार नाही. यामुळे चार मते दिल्याशिवाय मत ग्राह्य़ ठरणार नाही. कोणता उमेदवार मान्य नसल्यास नोटाचा पर्याय वापरावा लागेल.

मतदान यंत्रांवर रचना कशी असेल?

– मतदान यंत्रांवर प्रत्येक प्रभागांची रचना स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. अ जागेच्या मतपत्रिकेसाठी पांढरा रंग वापरण्यात येईल. म्हणजेच अ जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची नावे पांढरा रंग पाश्र्वभूमी असलेल्या रंगात लिहिली जातील. मतदान यंत्रांवर पांढरा रंग हा अ जागेचा राहील. ब जागेसाठी फिका गुलाबी रंग, क जागेकरिता फिका पिवळा रंग तर ड जागेसाठी फिका निळा रंग असेल. अ जागेच्या वरील भागात ही जागा कोणत्या वर्गाकरिता राखीव आहे याचा उल्लेख असेल. म्हणजेच प्रभाग क्र. १ क महिला असे स्पष्टपणे वरील भागात नमूद केलेले असणार.

चार मते देणे आवश्यक आहे?

– होय. चार मते दिल्याशिवाय मत ग्राह्य़च होणार नाही. प्रत्येक गटातील एक बटण दाबल्यावर आवाज येईल. चार मते दिल्यावर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचा गजर किंवा बिप वाजेल. उदा. एकाच गटातील म्हणजे पांढऱ्या रंगाच्या गटातील चार बटणे दाबल्यास त्या गटातील मत बाद ठरेल. एकूण चार मते दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पार पडूच शकत नाही. मुंबईत मात्र एकच मत देता येईल. बाकी नऊ महापालिकांमध्ये चार मते देणे बंधनकारक आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:52 am

Web Title: bmc elections 2017 5
Next Stories
1 ‘ब्रिटिशांच्या दूरदृष्टीने मुंबई घडवायची आहे’
2 राज्यभरातील प्रचार तोफा थंडावल्या
3 तोंडी परीक्षा संपली!
Just Now!
X