मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी नसण्यावरून अशोक चव्हाण यांचा चिमटा

मतदारांनी पाठ फिरविल्याने पुण्यातील सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाशा गुंडाळायला लागला. हे भाजपच्या विरोधातील बदलत्या हेवेचे द्योतक असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.

मुंबई  काँग्रेसच्या वतीने अ‍ॅन्टॉपहिल परिसरात झालेल्या समारोप सभेत चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपला लक्ष्य केले. भाजप आणि शिवसेनेतील वादात सरकार गडगडले आणि मध्यावधी निवडणुका झाल्यास काँग्रेसची पूर्ण तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सेनेचे मंत्री म्हणतात आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतोय. पण स्वाभीमान असेल, मराठी बाणा जिवंत असेल तर ते राजीनामे सेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करावेत, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. भाजपने आतापर्यंत प्रचारात धार्मिक तेढ निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न केला. उलट कॉंग्रेसने दोन धर्मातली तेढ मिटवून आणखी जवळ आणण्यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.

कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनीही सेना-भाजपवर तोंडसूख घेतले. दोन्ही पक्ष गेल्या २२ वर्षांपासून सत्तेत आहेत. पण साधे शुद्ध पाणीही ते मुंबईकरांना देऊ शकेलेले नाहीत, असा आरोप निरूपम यांनी केला. या दोन्ही पक्षांनी महापालिकेत घोटाळयांवर घोटाळे केले. पण विरोधक किंवा कॉंग्रेस जाब विचारेल म्हणून वेगवेगळे होऊन लढत आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही पक्षांनी घेतलेली काडीमोड हा दिखावा असल्याचेही निरूपम आपल्या भाषणात म्हणाले. या सभेत माजी खासदार एकनाथ गायकवाड, मिलिंद देवरा यांनीही भाषणे केली.

कामतांची अनुपस्थिती

मुंबईतील काँग्रेसच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या तसेच समारोप या दोन्ही सभांना अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुरुदास कामत हे उपस्थित नव्हते. कामत यांनी आधी प्रचारात सहभागी होणार नाही, असे जाहीर केले होते. पण नंतर ते सहभागी झाले. अन्य नेत्यांबरोबर प्रचारात सहभागी होण्याचे मात्र त्यांनी टाळले.