फेरीवाल्यांवरील कारवाईच्या मुद्दय़ाने वाद

पक्षाच्या जाहीरनाम्यानुसारच उमेदवाराने आपले प्रचारपत्रक जारी करताना काळजी घ्यावी, अशी सर्वसाधारण अपेक्षा असताना अंधेरी पश्चिमेतील एका प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने जारी केलेल्या प्रचारपत्रकात आपल्या पक्षाच्याच जाहीरनाम्यातील आश्वासनाला तिलांजली दिली आहे. विशेष म्हणजे स्थानिक आमदाराच्या छायाचित्रासह प्रसिद्ध झालेल्या या पत्रकात संबंधित आमदारानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे.

अंधेरी पश्चिमेतील फिदाई बाग-गावदेवी डोंगरी या ६६ क्रमांकाच्या प्रभातील भाजपच्या उमेदवार शीला शाह यांनी प्रचारपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अंधेरीतील रहिवाशांना फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास होत असला तरी आतापर्यंत कोणीही प्रत्यक्षात कारवाई करू शकलेले नाहीत. मतांसाठी फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचे आश्वासन उपयोगी ठरले असते. परंतु या परिसरातील फेरीवालेही मतदार असल्यामुळे ते या आश्वासनामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मते भाजपने आपल्या जाहीरनाम्यात फेरीवाल्यांना संरक्षण देऊ केले आले. सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून अनुज्ञापत्र देण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. ‘एकाच पक्षाचा आणि उमेदवाराचा वेगवेगळा जाहीरनामा कसा असू शकतो’, असा सवाल अर्बन स्ट्रीट हॉकर्स लोकसेवा केंद्राचे अध्यक्ष शेख परवेझ यांनी केला आहे. भाजपचा पाठिंबा असताना त्यांचे उमेदवार मात्र आम्हाला हाकलण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही शेख म्हणाले. भाजप उमेदवार शीला शाह यांना विचारले असता, त्यांनी काहीही स्पष्ट सांगण्यास नकार दिला. बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करायला नको का, असा सवाल केला.

जाहीरनाम्यात काय?

‘मुंबईच्या फेरीवाल्यांचे नियोजन’ या मथळ्याखाली स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना निश्चित व्यवसायाची वेळ आणि परिक्षेत्र नेमून देणार, फिरत्या फेरीवाल्यांना परवाने देणार आदी आश्वासने आहेत.

प्रचारपत्रकात काय?

फेरीवाल्यांविरुद्ध सलग कारवाई करणार

फेरीवाल्यांचे न्यायालयाच्या आदेशानुसार नियमन करावे े, या पक्षाच्या भूमिकेसोबतच आपण आहोत. मात्र रस्त्यावर ‘कुकिंग’ करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करायला लावणारच. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा तो अवमान आहे.

अमित साटम, आमदार, अंधेरी पश्चिम