राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई महापालिका निवडणुकीत विविध आश्वासने देऊन मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तब्बल ५०० कोटींची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव देणे कायद्याने बंधनकारक असतानाही भाजपने कोणत्याही जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख न करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला. पक्षातर्फे या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महापालिका निवडणुकीत पशाच्या जिवावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. एका पक्षाला मुंबईतील २२७ उमेदवारांसाठी २२ कोटी ७० लाखांच्या मर्यादेत खर्च करण्याची परवानगी असतानाही भाजपकडून मात्र तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे हा खर्च भाजपच्या उमेदवारांवर समसमान लादून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत १७४ जागेवर अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्या ५३ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेले नाहीत अशा जागी तेथील जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून भाजप-सेना-मनसे-एमआयएम सोडून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराला किंवा ताकदीच्या अपक्ष उमेदवारांना पािठबा देण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

शिवसेना वारंवार भाजपवर आरोप करून पाठिंबा काढण्याची धमकी देत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखानुदान मंजूर करताना राष्ट्रवादी मतदानाची मागणी करणार असून त्यावेळी शिवसेनेने सरकारविरोधात मतदान करावे. म्हणजे पाठिंबा न काढताच सरकार पडेल. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेना किंवा भाजप या कोणत्याही पक्षाला आपला पक्ष पािठबा देणार नाही. मध्यावधी निवडणुकीस पक्ष तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपकडून सरकारविरोधी बातम्या देणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी एनडीटीव्हीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता सामना पेपरवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा पद्धतीने भाजपकडून माध्यमांवर बंधने घालून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.