मुंबई महापालिकेत युती व आघाडीत बिघाड झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांवर प्रचारात यथेच्छ चिखलफेक केली. त्यानंतर मुंबईकरांच्या मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे; तथापि खरी लढत ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेची होणार आहे, कारण प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन पक्षांची सारी भिस्त प्रचारादरम्यान या दोन नेत्यांवरच होती.

महापालिका निवडणुकीत युती तुटल्यानंतर पारदर्शकतेच्या मुद्दय़ावरून भाजपने प्रचाराची राळ उडवली, तर केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबईला पारदर्शकतेत प्रथम क्रमांक मिळाल्याचा दाखला देत शिवसेनेने भाजपच्या प्रचारातील हवाच काढून टाकली. यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर विखारी टीका करण्यास सुरुवात केली. पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ापासून महाभारत, कौरव-पांडव, रावण, बकरी, वाघ, सिंह, गाजर, थापाडय़ा अशा विशेषणांचा मुक्तपणे वापर करून एकमेकांचा उद्धार करून सेना-भाजपने ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनवली. या साऱ्यात शेवटच्या टप्प्यात मनसेचे राज ठाकरे यांनी ‘वाद हवा असेल तर ते आणि विकास हवा असेल तर आम्ही’ अशी जाहिरात करून निवडणुकीत रंगत आणली.काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत भांडणे सुरू असली तरी संजय निरुपम यांनी सेना-भाजपवर जोरदार टीका करत काँग्रेसचेही मुंबईत स्थान असणार असे चित्र उभे केले, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमधून राष्ट्रवादीचे अस्तित्व दाखविले. खरी लढाई ही शिवसेना व भाजप यांच्यामध्येच असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई पालिकेत कोणता झेंडा फडकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.